वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:21 IST2025-01-10T19:20:55+5:302025-01-10T19:21:41+5:30
मस्साजोग खंडणी प्रकरण : सीआयडीकडून आवाजाची होणार तपासणी

वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग
बीड : आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन काेटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती. याची कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागली असून, आवाजाची तपासणी करणे सुरू झाले आहे. यासाठी व्हाॅईस सॅम्पल घेतले जात आहेत.
सुनील केदू शिंदे (वय ४२, रा. नाशिक, ह. मु. बीड) हे मागील एका वर्षापासून आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्पाची मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग याठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. २९ नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मीक अण्णा बोलणार आहेत, असे सांगितले. त्यानंतर ‘अरे, काम बंद करा. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा’, असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले कार्यालयात आला. ‘काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू’, अशी पुन्हा धमकी दिली. ‘काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या’, असे सांगितले होते.
याची सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. आता हीच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली आहे. तो आवाज कराड, चाटे यांचाच आहे का? यासाठी व्हाॅईस सॅम्पल घेतले जात आहेत. चाटे याचे यापूर्वीच सॅम्पल घेतले असून, कराड याचे गुरुवारी दुपारपर्यंत सॅम्पल घेतले नव्हते. तांत्रिक पुरावे जोडण्यासाठी सीआयडी काम करत असल्याचे दिसत आहे.
सरपंच हत्या प्रकरणातही दोघे आरोपी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे आरोपी आहेत. त्यातील चाटे हा सध्या खंडणीच्या प्रकरणात पोलिस कोठडीत आहे. घुले हत्या प्रकरणात अटक आहे.
कराडसोबत आलेल्यांची चौकशी?
कराड हा ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात शरण आला होता. यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि पांढरी गाडी होती. ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे. तर ज्यांची गाडी होती, ते शिवलिंग मोराळे यांनी अचानक कराड दिसल्याने आपण त्यांना वाहनातून सीआयडी कार्यालयात सोडल्याचा खुलासा केला होता. परंतु, त्यांच्यासह अन्य मदत करणारे लोकदेखील सीआयडीच्या रडारवर आहेत. त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.