बीडच्या जेलमधील भांडणाचाही वाल्मीक कराडच ‘मास्टरमाईंड’; महादेव गित्तेची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:09 IST2025-04-05T12:08:23+5:302025-04-05T12:09:11+5:30
या तक्रारीमुळे कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता, हे सिद्ध झाले आहे.

बीडच्या जेलमधील भांडणाचाही वाल्मीक कराडच ‘मास्टरमाईंड’; महादेव गित्तेची तक्रार
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महादेव गित्ते, राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे तक्रारीतून केली आहे. या तक्रारीमुळे कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता, हे सिद्ध झाले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांचे साथीदार हे बीडच्या कारागृहात आहेत तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गित्ते गँगमधील महादेव गित्ते आणि त्याचे साथीदारही याच कारागृहात आहेत. ३१ मार्च रोजी या सर्वांना फोन लावण्यासाठी बरॅकमधून बाहेर काढले होते. यावेळी वाल्मीक कराड आणि गित्ते गँग यांच्यात शाब्दीक चकमक होऊन हाणामारी झाली होती. परंतु, कारागृह प्रशासनाने कराडचा काहीच संबंध नसल्याचे सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला. परंतु, त्याच दिवशी गित्ते आणि दुसऱ्या दिवशी बीडमधील आठवले गँग इतर जेलमध्ये हलविण्यात आली होती. परंतु, आता महादेव गित्ते यांच्या तक्रारीमुळे नवा वाद निर्माण झाला असून, जेलमध्ये त्या दिवशी काय घडले? हे देखील उघड झाले आहे. दरम्यान, कारागृह अधीक्षक बक्सर मुलाणी यांना दुपारी १:५९ वाजता कॉल केला. परंतु, त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.
काय आहे तक्रार
मी आणि राजेश गायकवाड असे ३१ मार्च रोजी सकाळी बाहेर पडलो. यावेळी वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड, बालाजी दहिफळे, हैदर अली, लईक अली, योगेश मुंडे, जगन्नाथ फड व त्यांच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ते तपासून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार बीडच्या कारागृह प्रशासनाकडे केली आहे.