शेतात पडलेल्या विद्युत तारेचा धक्का बसलेल्या दोन मुलांना वाचविताना आईचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 17:51 IST2022-09-03T17:51:03+5:302022-09-03T17:51:33+5:30
शेतात पडलेल्या विद्युत तारेचा धक्का बसल्याने आई आणि दोन मुलांचा मृत्यू

शेतात पडलेल्या विद्युत तारेचा धक्का बसलेल्या दोन मुलांना वाचविताना आईचाही मृत्यू
गेवराई : शेतात पडलेल्या विद्युत तारेचा दोन मुलांना धक्का बसल्याचे पाहताच आईने त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र तिला देखील विद्युत धक्का बसला. यात दोन्ही मुलांसह आईचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील भेंडटाकळी तांडा राठोड वस्ती येथे शनिवारी दुपारी घडली. ललीता श्रीकात राठोड (३०) अभिजीत श्रीकांत राठोड (८), प्रशांत श्रीकांत राठोड (११) अशी मृतांची नावे आहेत.
ललिता राठोड या दोन्ही मुलांसह आज दुपारी भेंडटाकळी तांडा शिवारातील आपल्या शेतात गेल्या होत्या. खेळत असताना दोन्ही मुलांचा खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. दोघेही विजेचा धक्का बसल्याने कोसळल्याचे पाहून आई ललिता त्यांना वाचविण्यासाठी धावली. मात्र, त्यांना देखील विद्युत धक्का बसला. यात तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.