दिवटे प्रकरणात ट्विस्ट : आधी समाधान मुंडेला झाली मारहाण, मग बदल्यासाठी दिवटेला बदडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:12 IST2025-05-19T15:11:53+5:302025-05-19T15:12:07+5:30
परळीत गुन्हा दाखल होणार, प्रकरणाला जातीय रंग देऊ नये : पोलिस

दिवटे प्रकरणात ट्विस्ट : आधी समाधान मुंडेला झाली मारहाण, मग बदल्यासाठी दिवटेला बदडले?
बीड : परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिवटेला मारहाण करताना दिसणाऱ्या लांब केस असलेल्या समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. याप्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येते. तर दुसऱ्या बाजूला या घटनेला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले.
१६ मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यासाठी शिवराज दिवटे (१८ रा.लिंबोटी ता.परळी) हा मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून डाेंगरात नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली. त्यानंतर पायाही पडायला लावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवराजच्या जबाबावरून २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून ७ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यानंतर आता जलालपूरमध्ये समाधानलाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. त्याआधारे तक्रार घेऊन मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात परळीत गुन्हा दाखल केला जाणार आहे.
गुन्हेगाराला जात नसते
दिवटे प्रकरणात काही लोकांनी आरोपींच्या आडनावावरून जातीय उल्लेख करत सोशल मीडियावर वादंग उठवले आहे.
गुन्हेगारांना जात नसते. कोणीही असे प्रकार करून करिअर खराब करून घेऊ नये. असे काही घडत असेल तर पोलिसांना कळवा. वादग्रस्त पोस्ट करू नये, अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.
दिवटे प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यात दोन अल्पवयीनसह सात आरोपी ताब्यात आहेत. आता समाधान मुंडे नावाच्या तरुणालाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ आला आहे. त्यातही तक्रार येताच गुन्हा दाखल केला जाईल.
नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड