बीड : तालुक्यातील पेंडगाव, पारगाव जप्ती, हिंगणी येथील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
वाढीव वीजबिलांबाबत संभ्रम
अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले भरमसाट आल्याने अंबाजोगाई तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांनी महावितरणकडे वाढीव बिले आल्याच्या लेखी तक्रारी केल्या आहेत. या वाढीव बिलासंदर्भात सरकारने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे वीजबिले भरण्याबाबत अजूनही ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
आरटीओ कार्यालयात एजंटांची गर्दी
बीड : येथील आरटीओ कार्यालयात सध्या एजंटांची पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. परवाना व इतर कागदपत्रे काढण्यासाठी हे एजंट लोक पैशांची मागणी करून सामान्यांची आर्थिक लूट करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सामान्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करून एजंटांच्या कामाला येथील अधिकारीही प्राधान्य देत आहेत.
बांधकाम साहित्य रस्त्यावरच
गेवराई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
कठडे गायब
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे पुलाचे कठडे गायब झाले आहेत.
घाणीचे साम्राज्य
अंबाजोगाई : शहरातील मंडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सकाळी विक्रीसाठी येणारा भाजीपाला विक्री झाल्यानंतर उरलेल्या भाज्या तेथेच रस्त्यावर टाकल्या जातात. यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
चोऱ्यांमध्ये होतेय वाढ
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थ रात्रभर जागून पहारा देत आहेत. या भागात गस्तीची मागणी होत आहे.