पैशासाठी आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 15:13 IST2020-10-05T15:12:43+5:302020-10-05T15:13:17+5:30
बेपत्ता वडिलांच्या मिळालेल्या पीएफच्या पैशातील शिल्लक राहिलेल्या चार लाख रूपयांसाठी जन्मदात्या आईलाच दोन मुलांनी भर चौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

पैशासाठी आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न
बीड : बेपत्ता वडिलांच्या मिळालेल्या पीएफच्या पैशातील शिल्लक राहिलेल्या चार लाख रूपयांसाठी जन्मदात्या आईलाच दोन मुलांनी भर चौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना केज तालुक्यात कानडीमाळी येथे शनिवारी सायंकाळी घडली.
सरपंचांनी वेळीच मध्यस्ती केल्याने आई या हल्ल्यातून सुखरूप बचावली. ५० वर्षीय आई इंदुबाई कुचेकर यांच्या फिर्यादीवरून नितीन व संतोष कुचेकर या दोन्ही मुलांना केज पोलिसांनी अटक केली आहे.
आईला भर चौकात आणून संतोषने बाटलीत आणलेले पेट्रोल आईच्या डोक्यावर टाकले तर नितीनने खिशातून काडीपेटी काढून जळती काडी अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित हल्ल्यात सरपंचांनी प्रसंगावधान राखत नितीनच्या हातातील काडी फेकून दिली आणि पुढील अनर्थ टळला.
या हल्ल्यातून बचावलेल्या इंदुबाई यांनी केज पोलीस ठाणे गाठून दोन्ही मुलांविरूद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धे पुढील तपास करत आहेत. दोन्ही मुलांना न्यायालयाने दि. ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.