तेलगावात भरधाव ट्रक घरात घुसला; बाप ठार, मुलगा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:50 IST2018-06-03T00:50:15+5:302018-06-03T00:50:15+5:30

The truck rams into Tilgaon; Father killed, son serious | तेलगावात भरधाव ट्रक घरात घुसला; बाप ठार, मुलगा गंभीर

तेलगावात भरधाव ट्रक घरात घुसला; बाप ठार, मुलगा गंभीर

तेलगाव : भरधाव ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या घरात शिरला. यामध्ये घरात असलेल्यांपैकी वृद्ध जागीच ठार झाला तर त्याचा अपंग मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.

शंकर मोरे (वय ७२) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव असून नारायण मोरे हा गंभीर जखमी आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून सध्या खामगाव - पंढरपूर या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. याच कंपनीच्या मालकीचा एका ट्रकच्या (एमपी ०४ एचई ११६७) चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव ट्रक रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या मोरे यांच्या पत्र्याच्या शेडच्या घरात शिरला.

घरात असलेले शंकर मोरे यांच्या अंगावरून टायर गेल्याने ते जागीच ठार झाले तर बाजूला असणारा त्यांचा अपंग मुलगा गंभीर जखमी झाला. नारायणवर धारूर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजूलाच असणाऱ्या येनोबाई संदीपान चव्हाण यांच्या घराचेही यामध्ये नुकसान झाले आहे. चव्हाण यांच्या पायाला थोडी जखम झाली आहे. सुदैवाने त्या बालंबाल बचावल्या. शंकर मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: The truck rams into Tilgaon; Father killed, son serious