'एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार', सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:36 IST2024-12-27T15:34:39+5:302024-12-27T15:36:36+5:30

'त्या आकाच्या नावावर शेकडो एकर जमीन. गायरान जमिनीवर कब्जा मारायचा, हाच परळी पॅटर्न.'

Transactions worth Rs 9 billion in the name of a single person, Suresh Dhas' sensational allegation | 'एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार', सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

'एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार', सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

बीड- बीडच्या मस्साजोगमधील सरपंच, संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून, सातत्याने धनंडय मुंडेंवर निशाणा साधत आहेत. अशातच, आता धस यांनी एका मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. बीडच्या टेंभूर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी आज केला.

महादेव अॅपच्या माद्यमातून कोट्यवधीचा घोटाळा
बीडमध्ये पोलीस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंससह वाल्किम कराडवर नाव न घेता टीका केली. 'एकाच व्यक्तीच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात, याची संबंधित यंत्रणांनी तपासणी केली पाहिजे. मी पोलीस अधिक्षकांना सांगितले की, या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. महादेव अॅपच्या माध्यमातून हा घोटाळा झाला आहे. याची लिंक थेट मलेशियापर्यंत आहे. बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला, ' असा दावा धस यांनी केला. 

बीडमधील सर्व घटनांच्या मागे 'आका'
सुरेश धस यांनी यावेळी नाव न घेता वाल्मिक कराडांवर जोरदार टीका केली. 'बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या, कुठल्याही घटना घ्या, त्याच्या मागे एकच आका असतो. बीडपासून काही अंतरावर एका व्यक्तीच्या शेतातून बळजबरीने मुरुम काढून आणला गेला. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. 'गँग्स ऑफ वासेपूर'सारखी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या आकाच्या नावावर जिल्ह्यात किती जमिनी आहेत, ते एकदा तपासा.'

जमीन बळकवण्याचा परळी पॅटर्न

'परळीजवळ शिरसाळा गावात गायरान जमिनीवर कब्जा करुन गाळे बांधले गेले आहेत. शिरसाळ्यात 600 विटभट्ट्या चालतात, त्यातील 300 अवैध आहेत. गायरान जमिनीवर बंजारा आणि पारधी समाजातील लोकांची घरे होती. पोलीस लावून त्यांना हाकलून लावलं आणि गायरान जमिनीवर कब्जा केला. कुठे 100 एकर, कुठे 150 एकर...अशा कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आकाच्या नावावर आहेत. हा पैसा कुठूण आणला? गायरान जमिनीवर कब्जा मारायचा, हाच परळी पॅटर्न आहे. परळीमध्ये तर राखेचे माफिया मोठ्या प्रमाणात आहेत. याद्वारे कोट्यवधीची उलाढाल होते, असा आरोपही सुरेश धस यांनी यावेळी केला.

 

Web Title: Transactions worth Rs 9 billion in the name of a single person, Suresh Dhas' sensational allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.