बीडच्या बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच, यांना कोण आवरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:47 IST2025-06-06T18:46:35+5:302025-06-06T18:47:02+5:30

जिल्हा प्रशासनाच्या सावधानता अन् सुरक्षिततेच्या आवाहनाकडे हुल्लडबाजांचे साफ दुर्लक्ष

Tourists continue to riot at Beed's Bindusara Dam, who will stop them? | बीडच्या बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच, यांना कोण आवरणार?

बीडच्या बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच, यांना कोण आवरणार?

बीड : तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असून, अचानक पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे धरण परिसरात जाणे टाळावे, धरणाच्या काठावर उभे राहून फोटो किंवा सेल्फी घेणे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने टाळावे तसेच पालकांनी मुलांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. मात्र याकडे पर्यटक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

यापूर्वी २ युवकांचा दुर्दैवी मृत्यू
१९ ऑक्टोबर २०२१ रोजी बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात बुडून ओंकार लक्ष्मण काळे (वय १६) आणि शिव संतोष पिंगळे (वय १६) यांचा मृत्यू झाला होता. दररोजच्या पावसाने पाणी पातळीत वाढ होत असून, धोक्यात जीव घालून लोखंडी पुलावरून धरणाच्या भिंतीवर व पायथ्याशी पर्यटक सांडव्याच्या ठिकाणी जमा होत आहे. सांडव्याच्या भिंतीवर चढून फोटो काढतात. पाय घसरून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
बिंदुसरा धरणाच्या सांडव्याशेजारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कडेला सावधान, प्रतिबंधक क्षेत्र असा फलक लावण्यात आला आहे. अपघात, दुर्घटना अथवा जिवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार नाही, कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून असा फलक लावण्यात आला आहे. या तलावाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संरक्षण व्यवस्था नसल्यामुळेच त्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकतात मात्र प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षारक्षक नेमकं काय काम करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत. भविष्यात दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

Web Title: Tourists continue to riot at Beed's Bindusara Dam, who will stop them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.