वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलीस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम

By सोमनाथ खताळ | Updated: June 7, 2025 15:13 IST2025-06-07T15:10:38+5:302025-06-07T15:13:14+5:30

वडवणी पोलीस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच माफियाने गुटख्याचे गोदाम केले. तरी देखील वडवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती.

tobacco godown in front of police station in vadvani | वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलीस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम

वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलीस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम

बीड : वडवणी पोलीस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच माफियाने गुटख्याचे गोदाम केले. तरी देखील वडवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. परंतू स्थानिक गुन्हे शाखेने याची माहिती काढून शुक्रवारी दुपारी छापा मारला. यात एकाला ताब्यात घेत तब्बल साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने वडवणी पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अरविंद सुग्रिव म्हस्के (रा.बाहेगव्हाण ता.वडवणी) असे पकडलेल्या गुटखा माफियाचे नाव आहे. त्याचे पोलीस ठाण्यापासून साधारण ५०० मिटर अंतरावरच किराणा दुकान आहे. याच दुकानात त्याने गुटख्याचा साठा केला होता. मागील अनेक दिवसांपासून तो गुटख्याची विक्री करत होता. परंतू वडवणी पोलिसांना याची कसलीही खबर नव्हती. परंतू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही माहिती काढली. शुक्रवारी दुपारी या दुकानात छापा मारला. यात त्यांनी तब्बल साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, हवालदार राजु पठाण, महेश जोगदंड, राहुल शिंदे, बप्पासाहेब घोडके, अर्जुन यादव, चालक गणेश माराडे आदींनी केली.

या आरोपीचे होलसेल किराणा दुकान आहे. तो किराणाच्या माध्यमातून गुटखा विक्री करत होता, असे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे संशय येत नव्हता. पण माहिती असते तर कारवाई केली असती.
- वर्षा व्हगाडे, सहायक पोलीस निरीक्षक, वडवणी

Web Title: tobacco godown in front of police station in vadvani