थरारक! भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 23:30 IST2022-04-04T23:30:05+5:302022-04-04T23:30:57+5:30
कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला होता

थरारक! भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघे जागीच ठार
अंबाजोगाई : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात ४ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे झाला.
सोमवारी रात्री कार (एमएच २४ व्ही २५१८) भरधाव वेगाने अंबाजोगाईकडून आली. या कारच्या चालकाचे घाटनांदूर येथे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक देऊन शंभर मीटर अंतर फरफटत नेले. यात वैभव सतीश गिरी (वय २८), लहू बबन काटुळे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. तर, रमेश विठ्ठल फुलारी (वय ४७), उद्धव निवृत्ती दोडतले (वय ५०) आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सदरील कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला होता.