वाल्मीक कराडच्या अर्जावर तीन फिर्यादींचे म्हणणे सादर; कागदपत्रांसाठी ३ जूनची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:27 IST2025-05-20T14:26:09+5:302025-05-20T14:27:48+5:30
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पाचवी सुनावणी जिल्हा न्यायालयात पार पडली. ॲड. खाडे यांनी सांगितले की, दोषारोप पत्रासोबत जे काही महत्त्वाचे पुरावे दाखल केले आहेत त्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आम्हाला द्यायचे राहिले आहेत.

वाल्मीक कराडच्या अर्जावर तीन फिर्यादींचे म्हणणे सादर; कागदपत्रांसाठी ३ जूनची मुदत
बीड : सरपंच संतोष देशमुख खटल्यातून निर्दोष मुक्तता करावी, असा अर्ज वाल्मीक कराड याने न्यायालयात सादर केला होता. मागच्या तारखेला सरकारी पक्षातर्फे म्हणणे सादर करण्यात आले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीप्रसंगी तिन्ही गुन्ह्यांतील तिन्ही मूळ फिर्यादींनी त्यांचे म्हणणे सादर केले. आम्ही मागणी केलेली कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पूर्तता करण्यासाठी ३ जून रोजी तारीख दिली असल्याची माहिती आरोपी कराडचे वकील विकास खाडे यांनी सोमवारी दिली.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पाचवी सुनावणी जिल्हा न्यायालयात पार पडली. ॲड. खाडे यांनी सांगितले की, दोषारोप पत्रासोबत जे काही महत्त्वाचे पुरावे दाखल केले आहेत त्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आम्हाला द्यायचे राहिले आहेत. त्यातले काही पुरावे त्यांनी दिले व काही फॉरेन्सिकला गेले होते, असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. राहिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दोषमुक्तीसाठीचा विष्णू चाटेचा अर्ज मागे -
विशेष सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे म्हणाले, आरोपी विष्णू चाटे याने दोषमुक्तीसाठी दिलेला अर्ज त्यांच्या वकिलाने मागे घेतला आहे. पुन्हा अर्ज दाखल केला जाईल, अशी विनंती न्यायालयास केली आहे. या प्रकरणातील शिवराज देशमुख, शिवाजी थोपटे व सुनील शिंदे यांनीसुद्धा आपले म्हणणे मांडले आहे. पुढील सुनावणी ३ जून रोजी होणार आहे.