Three bikes meet an accident on the diversion road in Majalgaon; 3 killed on the spot | माजलगावात वळण रस्त्यावर तीन बाईक भिडल्या; तिघे जागीच ठार
माजलगावात वळण रस्त्यावर तीन बाईक भिडल्या; तिघे जागीच ठार

ठळक मुद्देमदत न करता बघ्यांची फोटोसाठी गर्दी

माजलगाव : गढी रोडवरील एमआयडीसीजवळील वळण रस्त्यावर तीन बाईकच्या विचित्र अपघातात एका महिलेसह दोनजण जागीच ठार झाले. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी बीड येथे रवाना करण्यात आले आहे. 

येथील एमआयडीसीजवळ असलेल्या बुखारी शाळेजवळ एक वळण रस्ता असून या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन बाईकमध्ये ( क्रमांक एम.एच. 12 क्यू.डी. 3207 , एम.एच. 47 ए. एफ. 0765 ) विचित्र अपघात झाला. या अपघातात तिन्ही बाईकचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात बाईकवरील गणेश श्रीकिसन मिसाळ (30 रा. देवळा ता. सेलू जी. परभणी) व अनोळखी महिला व पुरुष जागीच मृत झाली. तर अपघातात शंकर जितू भोसले, अजित भोसले ( रा. केकात पांगरी ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बीड येथे रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके, धोंडीराम मोरे, बाबरे , विठ्ठल राठोड, सहा. फौजदार शेळके, अनिल अत्तेवर यांनी येऊन मृतदेह उचलून ग्रामीण रुग्णालयात पाठवले तसेच खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. 

माणुसकी हरवू लागली 
अपघात झाल्यानंतर येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र अर्धातास जखमी मदतीविना रस्त्यावर पडून होते. त्यांना उचलून दवाखान्यात नेण्याचे धारिष्ट कोणीच दाखविले नाही तसेच पोलिसांना देखील कोणी कळविले नाही. प्रत्येकजण मोबाईलमध्ये फोटो घेण्यात आणि शूटिंग काढण्यात व्यस्त होती. यामुळे माणुसकी हरवत चालली आहे की काय असा प्रश्न पडू लागला आहे. 

आमदार सोळंकेचे चिरंजीव धावले मदतीला 
आ. प्रकाश सोळंके यांचे चिरंजीव विरेंन सोळंके  आणि त्यांचे सहकारी सुशील डक, सुरेश धुमाळ, लखन मुंडे हे या मार्गावरून जात असताना त्यांना गर्दी दिसून आली. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत दोन गंभीर जखमींना व मृतदेहांना ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

Web Title: Three bikes meet an accident on the diversion road in Majalgaon; 3 killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.