हाच पोलिस बॉडीगार्ड हवा, नेत्यांचा हट्ट का? पोलिस सुरक्षा सोडून हारतुरे उचलण्यातच व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:49 IST2025-02-03T12:47:30+5:302025-02-03T12:49:58+5:30
पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेतील कर्मचारी हे अंगरक्षक म्हणून नेत्यांकडे आहेत.

हाच पोलिस बॉडीगार्ड हवा, नेत्यांचा हट्ट का? पोलिस सुरक्षा सोडून हारतुरे उचलण्यातच व्यस्त
बीड : संवेदनशील प्रकरणात सर्व खात्री करून काही नेते आणि व्यक्तींना पोलिस संरक्षण म्हणून बॉडीगार्ड दिला जातो; परंतु हा देताना देखील काही नेते हट्ट करत असल्याचे समोर आले आहे. काही बॉडीगार्ड तर वर्षानुवर्षे एकाच नेत्याच्या मागेपुढे फिरताना दिसतात. सुरक्षेऐवजी त्यांचे हारतुरे उचलण्यात व्यस्त असतात. असे प्रकार अनेक सभा आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेकजण तर पोलिसिंग विसरून कार्यकर्तेच झाल्याचा आरोप केला जात आहे.
मंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ अधिकारी यांना मागणीनुसार पोलिस अंगरक्षक दिला जातो. ऑक्टोबर २०२३ मध्ये बीडमध्ये जाळपोळ झाल्यानंतर जिल्हा विशेष शाखेने काढलेल्या माहितीनुसार अनेकांना पोलिस अंगरक्षक दिले होते. काही दिवस घरांनाही सुरक्षा पुरवली होती; परंतु भीती नसल्याचे समजताच हे संरक्षण काढून घेतले. तोपर्यंत याची काहीही चर्चा झाली नाही; परंतु सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यात वाल्मीक कराड हा आरोपी झाला आणि त्याला दोन बॉडीगार्ड असल्याचे समजले. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला. विशेष म्हणजे त्याचा बॉडीगार्ड हा उत्तर प्रदेशमध्येही सोबत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अंगरक्षक पोलिसांचा मुद्दा ऐरणीवर आला. आता त्याच अनुषंगाने बॉडीगार्ड देताना पोलिस अधीक्षक स्वत: निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच नेत्याच्या मागे फिरणाऱ्या पोलिसांच्या पायाखालीच वाळू सरकली आहे. आता त्यांना इतर कामे करावी लागणार आहेत.
सध्या कोणाला अंगरक्षक?
मंत्री धनंजय मुंडे व ॲड. सुभाष राऊत यांना प्रत्येकी दोन अंगरक्षक आहेत. यासह मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. भीमराव धोंडे, जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित, मस्साजोगचे धनंजय देशमुख, ॲड. अजय तांदळे यांना प्रत्येकी एक अंगरक्षक आहे. शिवाय जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनाही अंगरक्षक आहेत.
मुख्यालयातील राखीव पोलिस का नाही?
पोलिस मुख्यालयात राखीव पोलिस असतात. त्यांच्यातून एखादा पोलिस कर्मचारी हे अंगरक्षक म्हणून नियुक्त करणे अपेक्षित असते; परंतु पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेतील कर्मचारी हे अंगरक्षक म्हणून नेत्यांकडे आहेत. अगोदरच पोलिस ठाण्यात मनुष्यबळ कमी आणि त्यात नेत्यांकडे अंगरक्षक जात असल्याने अडचण होत आहे.
आवडीचा न आल्यास परत पाठवतात
एखाद्या नेत्याकडे पोलिस कर्मचारी अंगरक्षक म्हणून नियुक्त केल्यावर काही दिवस सोबत ठेवतात. नंतर मात्र त्यांना कोणतेही कारण न देता परत पाठविले जाते. नेते असल्याने त्यांना कोणी विचारणा करण्याची तसदीही घेत नाहीत. जोपर्यंत आपल्या ओळखीचा येत नाही, तोपर्यंत नेतेही पाठपुरावा करत असल्याचे समजते. सध्या एका नेत्याने असे प्रकार केल्याचे सूत्रांनी सांगितले.