यालाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना, जळगाव तलावाचा सांडवा रात्रीतून फुटला की फोडला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:25 IST2023-09-27T14:23:02+5:302023-09-27T14:25:39+5:30
आधीच पुरसा पाऊस न झाल्याने पाणी टंचाई; त्यात सांडवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया!

यालाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना, जळगाव तलावाचा सांडवा रात्रीतून फुटला की फोडला?
- नितीन कांबळे
कडा- शेतकरी दुष्काळी संकटाच्या छायेत असताना अचानक पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पावसाने अनेक तलावात पाणीसाठा वाढला आहे. मात्र, जळगाव येथील तलावाचा सांडवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हा सांडवा फुटला की अन्य कोणी फोडला असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जळगाव तलावाचा सांडवा फुटला की फोडला ? आधीच पावसाची ओढ त्यात लाखो लिटर पाणी वाया! आष्टी तालुक्यातील घटना pic.twitter.com/8zajc2AP79
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 27, 2023
आष्टी तालुक्यातील जळगाव येथे २००२ साली साठवण तलाव बांधण्यात आला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे मोठे संकट ओढावले असताना मागील तीन दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे अनेक तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी आले. काही तर तुडूंब भरून वाहत आहेत. यातच मंगळवारी रात्री तलावाच्या सांडव्यातून एका बाजूने पाणी वाहू लागला. हा सांडावा फुटून त्यातून लाखो लिटर पाणी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अचानक पाणी वाया जात असल्याने सांडवा फुटला की फोडला यावर शंका आहे. सध्या सांडव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने यावर उपाययोजना कराव्यात, उंची वाढवावी तसेच सांडावा कसा फुटला याची चौकशी करावी अशी मागणी माजी सरपंच राम धुमाळ यांनी केली आहे.