"ही लढाई फक्त देशमुख कुटुंबीयांची नाही"; मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:41 IST2025-03-08T12:22:36+5:302025-03-08T12:41:54+5:30
सद्भावना यात्रा समाजमन जोडण्याचे काम करणार आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका

"ही लढाई फक्त देशमुख कुटुंबीयांची नाही"; मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू
मस्साजोग (बीड): सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येने महाराष्ट्र हादरला होता. आरोपींच्या क्रूरतेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली. दोन महिन्यांपासून देशमुख कुटुंब आणि त्यांच्या सोबतीला इतर समाज घटक न्यायासाठी लढा देत आहेत. या प्रकरणाच्या परिणामी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र लढा अद्याप संपलेला नाही. आता या प्रकरणी कॉंग्रेसने मस्साजोग ते बीड अशी ५१ किमीची सद्भावना यात्रा आज सकाळपासून सुरू केली आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही लढाई फक्त देशमुख कुटुंबाची नाही, सर्वांनी यात सामील व्हावे, असे आवाहन करत सद्भावना यात्रा समाजमन जोडण्याचे काम करणार आहे, अशी भूमिका मांडली.
आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग येथे दाखल झाले, जिथे त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांच्या न्यासाठीच्या लढ्याला पाठींबा जाहीर केला. त्यानंतर सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा सुरू झाली आहे. यात देशमुख कुटुंबीय देखील सामील झाले आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी समाजाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे नेणारा आहे. मात्र, जर एका उमद्या तरुणाची अशी क्रूर हत्या होत असेल, तर संपूर्ण समाजाने यावर चिंतन करण्याची गरज आहे. संपूर्ण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही." ते पुढे म्हणाले, "भय, द्वेष, मत्सर आणि पैशांची लालसा यामुळे ही हत्या झाली. आरोपींनी क्रूरतेने हसत हत्या केली, हे पाहून काळजाचा थरकाप उडतो. ही केवळ देशमुख कुटुंबियांची लढाई नाही, तर संपूर्ण समाजाने लढायची आहे."
जातीयतेच्या राजकारणावर टीका
हर्षवर्धन सपकाळ यांनी देशमुख कुटुंबीयांच्या संयमाचे कौतुक केले आणि धार्मिक व जातीयतेच्या राजकारणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "देशमुख कुटुंबियांनी अत्यंत विवेकपूर्ण भूमिका घेतली. त्यांनी कोणत्याही जाती-धर्मावर दोष न ठेवता न्यायाची लढाई सुरू ठेवली आहे. मात्र, समाजाला फोडून राज्य करण्याच्या प्रवृत्ती सक्रिय झाल्या आहेत. जाती-धर्मांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे."
सद्भावना यात्रा केवळ लोकशाहीच्या रक्षणासाठी
सपकाळ यांनी स्पष्ट केले की, सद्भावना यात्रा कोणत्याही निवडणुकीसाठी नाही, तर समाजात एकता टिकवण्यासाठी आहे. ते म्हणाले, "या क्रूर हत्येने माझे मन सुन्न झाले आहे. हा समाज असा कसा निर्माण झाला, असा प्रश्न मला पडतो. मात्र, देशमुख कुटुंबियांनी दाखवलेली सहनशीलता आणि सद्भावना लोकशाहीच्या रक्षणासाठी आवश्यक आहे." ही यात्रा समाजात सलोखा प्रस्थापित करण्यासाठी आणि हिंसाचाराला विरोध करण्यासाठी एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.