मंदिरातील दानपेटीवर तिसऱ्यांदा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 23:54 IST2020-02-06T23:53:16+5:302020-02-06T23:54:14+5:30
आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट येथील मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली.

मंदिरातील दानपेटीवर तिसऱ्यांदा डल्ला
कडा : आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट येथील मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. यापुर्वी देखील दोन वेळा दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी येथील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करत पोलिसांना आव्हान दिले आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरातील कुलूपबंद असलेली लोखंडी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी भेट दिली. तसेच घटनेचा पंचनामा केला, याप्रकरणी रात्री उशिरार्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. चोरलेली दानपेटी न फुटल्यामुळे ती आहे त्या अवस्थेत गावाशेजारी ज्वारीच्या शेतात टाकून चोरटे पळून गेले. ही दानपेटी ताब्यात घेतली असून, त्यामध्ये किती रक्कम होती हे अद्याप समजू शकले नाही. परंतु, सहा महिन्यापुर्वी येथील मंदिरातील दानपेटी चोरून चोरट्यांनी त्यातील पैसे चोरत ही दानपेटी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगा येथील शेततलावात टाकली होती. वारंवार चोरीच्या घटना घडत असून या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पिंपरी घाट येथील या मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना तिस-यांदा घडली आहे. पहिल्या दोन प्रकरणातील चोरट्यांचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा तिस-यांदा चोरी करण्याची हिंमत चोरट्यांनी दाखवली आहे.