गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:11 IST2019-05-03T00:10:59+5:302019-05-03T00:11:32+5:30
गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूूळ घातला आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे.

गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ
बीड : गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूूळ घातला आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. याला रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांचा वचक संपला की काय, असा प्रश्न उपस्थित होते. पुष्पा शर्मा खून प्रकरणाला एक महिना उलटूनही आरोपींना पकडण्यात आलेले नाही. त्यामुळे गेवराई पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
१ एप्रिल रोजी शहरातील पुष्पा शर्मा या महिलेचा खून करून दरोडेखोरांनी सव्वासात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. महिला उलटून गेला तरी अद्याप तपास लागलेला नाही. नंतर तालुक्यात वाळू माफियानींही धुमाकूळ घातला आहे. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून गेवराई पोलिसांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. या प्रकरणामुळे गेवराई पोलीस वाद्ग्रस्त ठरले असतानाच बुधवारी रात्री गढी येथे घरफोडी झाली. शामराव कुलकर्णी यांचे कुटुंब छतावर झोपलेले होते. खाली सर्वत्र कुलूप होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाट व इतर ठिकाणी ठेवलेले दागिने, रोख रक्कम असा पावणेसात लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पीएसओ, म्हणतात दाखल नाही...
गढी येथे कुलकर्णी यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार सकाळीच उघडकीस आला. याप्रकरणाची दुपारी ३ वाजेपर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
याबाबत गेवराई ठाण्यातील दूरध्वनीवर संपर्क करून विचारले असता घाणे नामक पीएसओंनी अद्याप दाखल झाले नसल्याचे सांगितले.
दुसºयांदा कॉल केल्यावर बावणकर नामक कर्मचाºयाने पोलीस निरीक्षक किंंवा पोउपनि यांच्याकडून माहिती घ्या, असे सांगून हात झटकले. हे प्रकरण दाखल करून घेण्यास उशीर का, असा सवाल उपस्थित होत आहे.
बीड शहरातही धाडसी चोरी
बीड : रानबा शंकरराव हातागळे यांचे संत नामदेवनगरमध्ये घर आहे. बुधवारी रात्री हातागळे कुटुंबिय घरात झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
घरातील ८.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दहा हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे २२ हजार रुपये किंमतीचे झुंबर, फूल व नगदी चार हजार असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सकाळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रानबा हातागळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. स.पो.नि. गिरी पुढील तपास करत आहेत.