बीडमध्ये खळबळ; सरकारी वकिलानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्याने संपवलं जीवन, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:32 IST2025-09-08T19:32:18+5:302025-09-08T19:32:41+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्याने तलावात उडी घेऊन संपवले जीवन, वडवणी तालुक्यातील देठेवाडी येथे घडली घटना

बीडमध्ये खळबळ; सरकारी वकिलानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्याने संपवलं जीवन, कारण काय?
वडवणी (बीड): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव (वय २९) यांनी देठेवाडी गावाजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेमुळे वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील असलेले डॉ. शुभम यादव यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून बीड येथे वास्तव्यास होते. वडवणी येथे ते एकटेच एका खोलीत राहत होते. शुक्रवारी दुपारी एका हॉटेल चालकाशी बोलताना त्यांनी आपण डोंगर आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जात असल्याचे सांगितले. मात्र ते परत न आल्याने त्यांच्या वडिलांनी वडवणी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. हॉटेल चालकाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी डोंगराळ भागात शोध घेतला असता, देठेवाडी येथील तलावात डॉ. शुभम यांचा मृतदेह आढळला. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने रात्री ९ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
कारण अद्याप अस्पष्ट
रविवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. वडवणी पोलिसांनी या प्रकरणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. डॉ. शुभम यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच येथील सरकारी वकील विनायक चंदेल यांनीही न्यायालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.