पुण्याहून दिवाळीसाठी निघालेला तरुण घरी पोहोचलाच नाही; आष्टीजवळ अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 16:53 IST2022-10-24T16:53:15+5:302022-10-24T16:53:28+5:30
दुचाकीवरून दोघे मित्र पुण्याहून गावाकडे जात होते.

पुण्याहून दिवाळीसाठी निघालेला तरुण घरी पोहोचलाच नाही; आष्टीजवळ अपघातात मृत्यू
- नितीन कांबळे
कडा (बीड): दिवाळीनिमित्त चाकण येथून परभणीकडे दुचाकीवर जाणाऱ्या तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत रविवारी पहाटे ४ वाजता बाळेवाडी फाटा येथे अपघात झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. मोहन पाडुरंग बर्वे ( रा. वरवंटी, गंगाखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील वरवंटी येथील मोहन पाडुरंग बर्वे आणि पालमचा सिध्देश्वर दिंगाबर धुळगुडे हे दोघे मित्र चाकण येथे एका खाजगी कंपनीत काम करतात. दिवाळी सणासाठी दोघेही सुटी घेऊन रविवारी पहाटे दुचाकीवरून ( क्र. एमएच २२ एकएक्स १२०५ ) गावी निघाले. बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा येथे पहाटे चार वाजता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
यात मोहनचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धेश्वर गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे अंमलदार मनोज खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. मृताचे कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.