जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; नवरा-बायकोचे भांडण सोडविणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 19:50 IST2022-12-31T19:46:11+5:302022-12-31T19:50:37+5:30
दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या जावयाला समजावून सांगत असतानाचा प्रकार

जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; नवरा-बायकोचे भांडण सोडविणे पडले महागात
केज(जि.बीड) : नवरा - बायकोचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सासऱ्याच्या अंगावर ठोंब्या घेऊन धावलेल्या जावयाने हाताला कडाडून चावा घेतला. ही घटना २६ डिसेंबरला शहरातील समता नगरात घडली.
अश्विनी व पती बन्सी हंकारे हे जवळबनचे रहिवासी असून, सध्या समतानगरात वास्तव्यास आहेत. बन्सी हंकारे हा दारु पिऊन पत्नी आणि मुलास नेहमीच मारहाण करीत असे. २६ रोजी अश्विनीचे वडील उत्तम रंगनाथ मस्के हे केज येथील मुलीच्या व जावयाच्या घरी गेले व जावई बन्सी हंकारे याला समजून सांगत होते. बन्सी हंकारे याने सासऱ्याचे गचुरे धरून मारहाण केली. तसेच सासऱ्याला मारण्यासाठी हातात दगडी ठोंब्या घेऊन अंगावर धावला. रागाच्या भरात बन्सी हंकारे याने सासरा उत्तम मस्केच्या हाताच्या डाव्या मनगटाला कडकडून चावा घेतला आणि दुखापत केली.
याप्रकरणी अश्विनी हंकारे हिच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक बाळराजे सोनवणे अधिक तपास करीत आहेत.