सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण आले समोर; दोन आरोपी अटकेत, चौघे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:53 IST2024-12-11T13:52:18+5:302024-12-11T13:53:46+5:30

केजमध्ये मंगळवारी दिवसभर रास्ता रोको; सायंकाळी बस पेटवली

The reason behind the murder of Sarpanch Santosh Deshmukh came out; Two accused arrested, four absconding | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण आले समोर; दोन आरोपी अटकेत, चौघे फरार

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण आले समोर; दोन आरोपी अटकेत, चौघे फरार

बीड : चार दिवसांपूर्वी पवनचक्कीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दाेन गटांत वाद झाला. यात मस्साजोगच्या सरपंचाने मध्यस्थी केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. याच मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. याचाच राग आरोपींच्या मनात होता. हे सर्व सरपंचाने केल्याच्या गैरसमजुतीतून सहा जणांनी अपहरण करून वायरने गळा आवळून सरपंच संतोष देशमुख (रा. मस्साजोग, ता. केज) यांचा खून केला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. यात सहापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून, चौघे फरार आहेत. आमचा अपमान झाल्यानेच हे कृत्य केल्याचे आरोपींनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचे मंगळवारीही केज तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. दिवसभर केज ते मांजरसुंबा या महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. सायंकाळी एक बसही जमावाने पेटवली.

जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (दोघे, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर) असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. ६ डिसेंबर रोजी मस्साजोग परिसरात पवनचक्कीचे काम करणाऱ्या लोकांसोबत सुदर्शन घुले व इतरांचा वाद झाला होता. यात देशमुख यांनी मध्यस्थी केली. याच मारहाणीचा व्हिडीओदेखील काही लोकांनी बनवला. तो नंतर व्हायरल झाला. हे सर्व कारस्थान देशमुख यांनीच केल्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळेच त्यांनी सोमवारी दुपारी देशमुख यांचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या करत मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास सुरू करून दोघांना मंगळवारी पहाटे केज तालुक्यातील तांबवा येथून अटक केली. तर फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

मंगळवारी दिवसभर लोक रस्त्यावर, बसही पेटवली
आरोपींना अटक करावी, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, यांसारख्या विविध मागण्यांसाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच केज शहरातही मुख्य रस्ता अडविण्यात आला. सकाळी ११ वाजता अडवलेला रस्ता दुपारी साडेचार वाजेपर्यंतही खुला केला नव्हता. सायंकाळी एक बसही जमावाने पेटवली. पोलिसांनी ती शमविण्यासाठी धावपळ केली. तसेच केज शहरासह मस्साजोग येथे पोलिसांचा फौज फाटा तैनात केला होता. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण होते.

मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी दुपारी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर केजमधील आंदोलकांचीही भेट घेतली. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही सर्व देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. न्याय मिळाल्याशिवाय सुटी नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

गतीने आणि सर्व बाजूने तपास
देशमुख खून प्रकरणात सहापैकी दोन आरोपी पकडले आहेत. इतर चौघांचा शोधही सुरू आहे, तसेच आरोप असलेल्या पाटील नावाच्या पोलिस उपनिरीक्षकालाही नियंत्रण कक्षात अटॅच केले आहे. आंदोलकांना आवाहन करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. सर्वांनी शांतता राखावी. या प्रकरणाचा गतीने आणि सर्व बाजूने तपास केला जाईल, असे आश्वासन दिले असून, आंदोलकांनी संयम व विश्वास ठेवावा.
- सचिन पांडकर, अपर पोलिस अधीक्षक, बीड

Web Title: The reason behind the murder of Sarpanch Santosh Deshmukh came out; Two accused arrested, four absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.