फिर्यादीच निघाला आरोपी; वर्गमित्राच्या मदतीने दुकानाची ६ लाखांची रोकड पळवल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:31 IST2023-01-10T14:30:59+5:302023-01-10T14:31:45+5:30
दुकानाचे ६ लाख रुपये घेऊन येत असताना लुटल्याचा रचला बनाव

फिर्यादीच निघाला आरोपी; वर्गमित्राच्या मदतीने दुकानाची ६ लाखांची रोकड पळवल्याचे उघड
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : धामणगाव-कडा रोडवर चाकूचा धाक दाखवून सहा लाख रूपयांची रोकड पळवल्याची घटना बनाव असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चक्क फिर्यादीच आरोपी निघाला आहे. वर्गमित्राच्या मदतीने त्याने हे चोरी केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथील आदेश गौतम बोखारे हा कडा येथील राहुल पटवा याच्या दुकानात कामावर होता. दररोजच्या व्यवहाराचे पैसे गोळा करून आदेश दुकानात आणायचा. नेहमीप्रमाणे तो ११ जुलै २०२२ रोजी परिसरातील उधारीचे पैसे गोळा करून धामणगाव येथे आला. तेथून पैठण-बारामती रोडने कड्याकडे दुचाकीवरून निघाला. याच रोडवरील गितेवाडी शिवारात अनोळखी लोकांनी गाडी आडवत चाकूचा धाक दाखवून बॅगमधील सहा लाख रूपये घेऊन गेल्याचे आदेशने सांगितले.
अंभोरा पोलिस ठाण्यात आदेश बोखारेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पण मागमूस लागत नव्हता. मात्र, ९ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने आदेश गौतम बोखारे ( २२ रा.चोभानिमगांव ) आणि महेश त्रिंबक करडुळे ( २३ रा. धिर्डी ) यांना सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी वर्गमित्रांच्या मदतीने पैसे चोरले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा बनाव केल्याची कबुली दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, अंमलदार प्रसाद कदम यांनी केली. सदरील आरोपीला अंभोरा पोलिसाच्या ताब्यात दिले असून अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करित आहेत.