शिपायास फोनकरून भेटायला बोलवले, काहीवेळाने घरासमोर आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 12:04 IST2023-07-21T12:03:43+5:302023-07-21T12:04:50+5:30
डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती, गुरुवारी रात्रीची घटना

शिपायास फोनकरून भेटायला बोलवले, काहीवेळाने घरासमोर आढळला मृतदेह
माजलगाव : रात्री फोनकरून भेटायला बोलावलेल्या धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील शिपायाचा काही वेळाने घरासमोर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अनिल सर्जेराव शेंडगे असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली.
अनिल सर्जेराव शेंडगे हे धारूर तालुक्यातील चिखली येथील मूळ रहिवासी होते. ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर कार्यरत होते. तर माजलगाव शहरातील मंजरथ रोड, शिक्षक कॉलनी येथे ते कुटुंबासह राहत. गुरुवारी रात्री आठवाजेच्या दरम्यान मोबाईलवर एकाने फोनकरून त्यांना बायपास रोडला बोलून घेण्यात आले. येथे डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह घरासमोर आणून टाकला. नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर शेंडगे यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल तळेकर अधिक तपास करत आहेत.