शॉर्ट सर्किटमुळे घर पेटले; गॅस सिलेंडर स्फोटाने शेजारचे घरही जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:49 IST2022-04-20T19:49:04+5:302022-04-20T19:49:26+5:30
आग विझविण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

शॉर्ट सर्किटमुळे घर पेटले; गॅस सिलेंडर स्फोटाने शेजारचे घरही जळून खाक
माजलगाव ( बीड) : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शहरातील नवनाथ नगर भागातील दोन घरे जळून खाक झाले आहेत. ही घटना आज दुपारी 5 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यावेळी नागरिकांनी फोन करूनही अग्निशामक दल एक तासाने घटनास्थळी दाखल झाले.
शहरातील नवनाथ नगर भागातील शिवानंद मनोहर डहाळे यांच्या घरात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. बघताबघता या आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घराला कवेत घेतले. यात घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य जळाले. दरम्यान, अचानक घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे पेटत्या वस्तू दूरवर विखुरल्या आणि शेजारील दिनकर विश्वनाथ जोगडे यांच्याही घराला आग लागली. क्षणात आग वाढत जाऊन जोगडे यांच्या संपूर्ण घरात पसरली. यात संसार उपयोगी साहित्य, कपडे जळून खाक झाले.
दरम्यान, फोन करूनही अग्निशमन दल एक तासानंतर पोहचले. आग विझविण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल दोन तास लागले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही. घरातील एकही वस्तू शिल्लक न राहिल्याने डहाळे कुटुबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.