ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:45 IST2022-03-24T14:42:36+5:302022-03-24T14:45:07+5:30
आज सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला.

ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले
बीड: दोन दिवसांपूर्वी वडिलांना फोन करून रडत रडत तिने माहेरी घेऊन जाच होत असल्याचे सांगितले होते. वडिलांनी तिची समजूत काढून ईदला घ्यायला येईल असे वचन दिले होते. मात्र, नवविवाहितेच्या जाचाला शेवट वाईट झाला. तिसऱ्या मजल्यावरून फेकून तिचा खून केल्याच्या आरोपावरून पती, दीर व जाऊविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत २४ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली.
यासमीन शकूर शेख (२१, रा. शाहूनगर, बीड) असे मयत विवाहितेचे नाव आहे.तिचे वडील रहीम शरिफोद्दिन शेख (रा. इस्लामपुरा, पेठ बीड)यांच्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. २४ रोजी सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.
पती ताब्यात, नातेवाईकांची गर्दी
उपाधीक्षक संतोष वाळके,शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड, उपनिरीक्षक बाळराजे दराडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.पती शेख शकूर यास ताब्यात घेतले आहे. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.