बीड-अहिल्यानगर मार्ग कामाची आधीच संथगती, त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:01 IST2025-05-24T15:59:41+5:302025-05-24T16:01:05+5:30
आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

बीड-अहिल्यानगर मार्ग कामाची आधीच संथगती, त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेल्या साबलखेड ते चिंचपुर रस्ता कामाने नागरिकांना जेरीस आणले आहे. आता तर शेरी येथील पर्यायी व्यवस्था केलेला पूल खचल्याने वाहनाधारकांची तारांबळ उडाली आहे. सुदैवीने कसलीही दुर्दैवी घटना घडली नाही. बीड-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक आष्टी पोलिसांनी वळवली असून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम गतीने होत नसल्याने वाहनधारकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. यामुळे बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शेरी बुद्रुक येथील पर्यायी पूल सकाळी खचला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ही माहिती मिळताच आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर याच्यासह पोलिस नाईक विकास जाधव,बब्रुवाण वाणी,चालक प्रताप घोडके यांनी धाव घेत वाहतूक पर्यायी मार्गे वळवली आहे. मात्र, बीड-अहिल्यानगर महामार्गाची आधीच संथगती असून त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामाची गती वाढवून महामार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग:
अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक आष्टी - बेलगाव - किन्ही - केरूळ - कडा- आष्टी मार्गे जामखेड
बीड कडे जाणारी वाहतूक कडा - केरूळ - किन्ही - बेलगाव - आष्टी.