Beed Crime: दुपारी 'थार' विकली मध्यरात्री चोरून नेली; 'डबल गेम' करणाऱ्या मालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:28 IST2025-11-03T12:25:42+5:302025-11-03T12:28:23+5:30
पाचही आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणूक (४२०) आणि चोरीचा गुन्हा दाखल

Beed Crime: दुपारी 'थार' विकली मध्यरात्री चोरून नेली; 'डबल गेम' करणाऱ्या मालकावर गुन्हा
- मधुकर सिरसट
केज (बीड): विश्वास आणि व्यवहाराला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना केज तालुक्यातून उघडकीस आली आहे. एका थार (Thar) गाडीचा व्यवहार करून पाच लाख रुपये घेतल्यानंतर, मूळ मालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने ती गाडी विकत घेणाऱ्याच्या घरासमोरूनच मध्यरात्री चोरून नेली. या 'डबल गेम' प्रकरणी गाडी घेणाऱ्या तरुणाच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी येथील राहुल रामहरी कांदे यांनी गुरुवारी (दि. ३०) पुणे येथील प्रताप शेषेराव राठोड यांच्या मालकीची थार गाडी (MH-12/WK-2276) पाच लाख रुपयांना विकत घेतली. केज येथे झालेल्या या व्यवहारात प्रताप राठोड आणि त्याचे चार मित्र (संजय पवार, शहबाज खान, रवी मुंडे, गणेश नडगीरे) सामील होते. रात्री ११ वाजता राहुल कांदे गाडी घेऊन परळी येथील घरी पोहोचले आणि त्यांनी गाडी घरासमोर लावून ते झोपी गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ३१) सकाळी ६ वाजता उठल्यावर त्यांना घरासमोर गाडी दिसली नाही.
'मूळ मालकच घेऊन गेला, केस करू नका!'
गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच राहुल यांनी तातडीने व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या संजय पवारला फोन केला. त्याने माहिती नसल्याचे सांगितले. नंतर राहुल परळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, तिथे संजय पवार आणि रवी मुंडे भेटले. त्यांनी राहुलला सांगितले की, "सदरची गाडी मूळ मालक प्रताप राठोडच घेऊन गेला आहे. त्यामुळे तुम्ही केस करण्याचे भानगडीत पडू नका. तो तुमचे पैसे परत देणार आहे." आरोपींनी राहुल यांना पोलीस तक्रार न करण्याची विनंती केली.
'डबल गेम' करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा
मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुल कांदे यांनी पाचही आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणूक (४२०) आणि चोरीचा गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर हे पुढील तपास करत आहेत.