साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या तेलंगणाच्या भाविकांना गेवराईजवळ रॉडचा धाक दाखवून लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:10 IST2025-12-05T15:08:32+5:302025-12-05T15:10:02+5:30
महिलांच्या दागिन्यांची लूट; गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या तेलंगणाच्या भाविकांना गेवराईजवळ रॉडचा धाक दाखवून लुटले
गेवराई : साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील भाविकांच्या कुटुंबाला गेवराई तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील वडगाव ढोक फाटा येथे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास ही भीषण रस्ता लूट झाली.
शिवप्रसाद किशोरकुमार पौने (रा. कल्पना सोसायटी, गणेशनगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) हे आपल्या कुटुंबासह कारने क्र. (टीजी ०८ एबी ६९८९) शिर्डीला जात होते. वडगाव ढोक फाट्यावर महिला शौचालयासाठी थांबल्या असताना, त्या परत गाडीत बसताच तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात चार चोरट्यांनी अचानक त्यांच्या गाडीची काच फोडली. चोरट्यांनी हातात लोखंडी रॉड आणि अन्य हत्यारे घेऊन कुटुंबातील सदस्यांना धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने तसेच पुरुषांच्या गळ्यातील चेन असा तब्बल ३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पसार झाले. या प्रकरणी शिवप्रसाद किशोरकुमार पौने यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके आणि पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब पवार अधिक तपास करत आहेत.
महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
अंधाऱ्या आणि निर्जन पट्ट्यात घडलेल्या या धाडसी लूटप्रकरणामुळे महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वाढत्या प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.