आष्टीत हाॅटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:23 IST2025-08-02T14:18:18+5:302025-08-02T14:23:25+5:30
कुटुंबासह,नातेवाईक पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून

आष्टीत हाॅटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार!
- नितीन कांबळे
कडा (बीड): मागील एक महिन्यापासून तालुक्यातील एका हाॅटेलवर कामगार असलेल्या एकाचा शुक्रवारी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यू संशयास्पद असल्याने कुटुंबासह, नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शनिवारी पोलिस अधिक्षक कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.
आष्टी तालुक्यातील खडकत येथील एका हाॅटेलवर मागील एक महिन्यापासून जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धेनटाकळी येथील सिताराम रखमाजी ढवळे ( ४०) हे कामगार म्हणून कामाला होते. शुक्रवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान त्यांचा हाॅटेलवरील वरच्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी हा मृत्यू संशयास्पद असून खुनाचा गुन्हा दाखल करावा. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील सदस्य व नातेवाईक बीड येथे पोलिस अधीक्षकांकडे गेले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून ठाण मांडून बसले आहेत.
घटनास्थळी आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलिस हवालदार प्रवीण क्षीरसागर, हनुमान घाडगे, भरत गुजर, बिभीषण गुजर, चालक भाग्यवंत यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहावर आष्टी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह ताब्यात न घेतल्याने आष्टी येथील शवगृहात ठेवण्यात आले आहे.