तरूणाचा संशयास्पद मृत्यू, गुन्हा दाखलसाठी रुग्णवाहिकेतून मृतदेह काढला अन् थेट पोलीस ठाण्यात ठेवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 22:19 IST2026-02-20T22:19:02+5:302026-02-20T22:19:18+5:30
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह परत आणला असता, नातेवाईकांचा राग अनावर झाला.

तरूणाचा संशयास्पद मृत्यू, गुन्हा दाखलसाठी रुग्णवाहिकेतून मृतदेह काढला अन् थेट पोलीस ठाण्यात ठेवला!
दिंद्रुड (जि.बीड) : धारूर तालुक्यातील गावंदरा येथील २३ वर्षीय तरुण धर्मराज अर्जुन बडे याचा मृतदेह शुक्रवारी कारी शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री चक्क दिंद्रुड पोलीस ठाण्यात मृतदेह आणून ठेवला आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जोरदार ठिय्या आंदोलन केले.
शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता लिंबाच्या झाडाला धर्मराजचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. प्राथमिक पंचनाम्यानंतर मृतदेह धारूर येथे नेण्यात आला होता, मात्र नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त करत 'इन-कॅमेरा' शवविच्छेदनाची मागणी केली. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह परत आणला असता, नातेवाईकांचा राग अनावर झाला.
पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास रुग्णवाहिकेतील मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला. 'जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही,' असा पवित्रा घेत नातेवाईकांनी गोंधळ घातला. सपोनि महादेव ढाकणे यांनी समजूत काढण्याचे प्रयत्न केले, परंतु ते निष्फळ ठरले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण होते. नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम असल्याने दिंद्रुड पोलिसांसमोरील पेच कायम आहे.