सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:46 IST2025-01-24T13:45:26+5:302025-01-24T13:46:14+5:30
Walmik Karad: कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे.

सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती
BJP Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांनी पवनचक्की खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्याविरोधात सुरू केलेली मोहीम आणखी व्यापक करणार असल्याची माहिती आहे. "वाल्मीक कराडची मांजरसुंभा परिसरात २०-२५ एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर ही जमीन आहे. कराडच्या सर्व संपत्तीबाबतची कागदपत्रे गोळा करण्याचं काम सुरू असून ही कागदपत्रे मी ईडीकडे देणार आहे," असं सुरेश धस यांनी सांगितलं आहे.
वाल्मीक कराडवर आरोप करताना सुरेश धस म्हणाले की, "कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावावर मांजरसुंभा इथं २०-२५ एकर जमीन घेतली. या जमिनीतील खड्डे बुजवण्यासाठी रसाळ नावाच्या व्यक्तीच्या जमिनीतून त्याच्या मर्जीविरोधात मुरुम नेण्यात आला. कराडची अशी अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. त्याची कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे. ईडीकडून याआधीच नोटीस आली असून मी पुन्हा तक्रार करणार आहे," असं आमदार धस यांनी सांगितलं आहे.
"आरोपींना विदर्भातील तुरुंगात टाका"
खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने आपल्याला लातूर जिल्ह्यातील तुरुंगात हलवावं, असा अर्ज पोलीस प्रशासनाकडे केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर आरोपींना मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगात न नेता विदर्भातील तुरुंगामध्ये न्यावं, अशी मागणी धस यांनी केली आहे. "हे आरोपी त्यांना लातूरच्या तुरुंगात नेण्याची मागणी का करत आहेत, याची माझ्याकडे माहिती आहे. पण जेव्हा याबाबतचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा मी सांगेन. पण या आरोपींना लातूर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगही नको, त्यांना विदर्भात ठेवा. कारण तिकडच्या तुरुंगाचे अधिकारी बदलत असतात," असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुरेश धस यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा, अशी मागणी आमदार धस यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.