अधीक्षक नवनीत काँवत यांचे बीड पोलिस दलात मोठे बदल, ठाण मांडलेले कर्मचारी बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:29 IST2025-06-05T19:28:59+5:302025-06-05T19:29:29+5:30

मुख्यालय, शाखेत ठाण मांडलेले कर्मचारी बाहेर काढले; पाेलिस ठाण्यांत वाढले मनुष्यबळ

Superintendent Navneet Kanwat makes major changes in beed police force, employees who were stationed at the station are removed | अधीक्षक नवनीत काँवत यांचे बीड पोलिस दलात मोठे बदल, ठाण मांडलेले कर्मचारी बाहेर काढले

अधीक्षक नवनीत काँवत यांचे बीड पोलिस दलात मोठे बदल, ठाण मांडलेले कर्मचारी बाहेर काढले

बीड : पोलिस दलातील जवळपास ३० ते ४० टक्के कर्मचारी हे आतापर्यंत राजकीय वशिला अथवा लक्ष्मीदर्शन करून विशेष शाखा किंवा मुख्यालयात थांबत होते. अनेकांनी तर नोकरीला लागल्यापासून पोलिस ठाण्यात कामच केले नव्हते. अशा सर्वांचा शोध घेऊन त्यांना आता पोलिस ठाण्यात पाठविले आहे. त्यामुळे ठाण्यातील मनुष्यबळही वाढले आहे. आता सामान्यांना विश्वास वाटेल, असे काम करा, अशा सूचना पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ठाणेदारांना दिल्या.

जिल्ह्यात जिल्हा पोलिस दलात जवळपास २३०० कर्मचारी आहेत. यातील केवळ १ हजारच कर्मचारी हे पोलिस ठाण्यात काम करत होते. इतर कर्मचारी हे विशेष शाखा, साइड ब्रँच, पोलिस मुख्यालय अथवा इतर शाखेत कार्यरत हाेते. परंतु, यावेळी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बदलीचे काही निकष लावल्याने अनेकांची तारांबळ झाली. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना आता पाेलिस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन काम करून घ्या, त्यांना काम शिकवा, अशा सुचनाही काँवत यांनी दिल्या आहेत.

२९ ठाण्यांत केवळ १ हजार कर्मचारी
आतापर्यंत २३०० पैकी केवळ १ हजार कर्मचारी हे पोलिस ठाण्यात काम करत असे. कमी मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण यायचा. त्यामुळे ते संताप व्यक्त करायचे. १३०० कर्मचारी हे आतापर्यंत बाजूलाच होते. त्यांना गुन्ह्याचा तपास कसा करतात, दोषारोपपत्र कसे बनवतात, हेच माहिती नाही. पण, आता या सर्वांना काम करावे लागणार आहे. अशा लपून बसलेल्यांना पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली आहे.

दोन ठाण्यांची अडचण
बीड शहर आणि परळीतील संभाजीनगर पोलिस ठाण्यात अगाेदरच्यापेक्षा कमी मनुष्यबळ दिसत आहे. परंतु, तेदेखील वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र लोक दिले जाणार आहेत. १० जूनपर्यंत यावर निर्णय होणार आहे.

कामात गती येईल
काही कर्मचारी हे विशेष शाखा किंवा इतर ठिकाणी कार्यरत होते. परंतु, मी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे बदल्या केल्या. शिवाय पोलिस ठाण्यातही मनुष्यबळ वाढवून दिले. त्यामुळे कामात गती येईल. जे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणार.
-नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड

कशी आहे मनुष्यबळाची आकडेवारी
पोलिस ठाणे - अगाेदर - आता

बीड शहर - ५०- ४२
बीड ग्रामीण - ४४ - ४७
पेठबीड - ४६ - ४६
शिवाजीनगर ६२ - ६८
पिंपळनेर - ३१ - ३३
गेवराई - ६२ - ७२
तलवाडा - २८ - ३४
चकलांबा - ३२ - ३७
आष्टी - ४८ - ६८
पाटोदा - ३९ - ५३
अंभोरा - ३७ - ४०
अंमळनेर - २८ - २९
शिरूकासार - ३७ - ३८
अंबाजोगाई शहर - ६० - ६७
अंबाजोगाई ग्रामीण - ४६ - ४३
परळी शहर - ४० - ४०
संभाजीनगर - ४३ - ३८
परळी ग्रामीण - ३१ - ४२
बर्दापूर - ३२ - ३८
केज - ४९ - ६३
धारूर - ३६ - ४१
युसूफवडगाव - २८ - ३२
नेकनूर - ३८ - ४३
माजलगाव शहर - ४० - ६४
माजलगाव ग्रामीण - ४० - ५१
सिरसाळा - ३२ - ३७
वडवणी - ३२ - ४९
दिंद्रूड - २८ - ३३

Web Title: Superintendent Navneet Kanwat makes major changes in beed police force, employees who were stationed at the station are removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.