suicides of maid over stealing charges in Parali | चोरीचा आरोप जिव्हारी लागल्याने मोलकरणीची आत्महत्या

चोरीचा आरोप जिव्हारी लागल्याने मोलकरणीची आत्महत्या

परळी :  दागिने चोरीचा आरोप सहन न झाल्याने शहरातील स्नेहनगर भागात राहणाऱ्या एका मोलकरीण महिलेने गुरुवारी (दि. ७ ) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी ( दि.९ ) सकाळी चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेऊन आंदोलन केले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्नेहनगर भागात राहणाऱ्या छबुबाई नारायण पाचमासे (वय 55) या मोलकरीण म्हणून काम करतात. दोन वर्षापासून त्या जलालपूर भागातील एका इमारतीमधील काही घरचे घरकाम करत. येथील एका घर मालकिणीने छबुबाईवर दागिने चोरीचा आरोप केला होता. हा आरोप जिव्हारी लागल्याने त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तत्काळ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे. 

दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी छबूबाई यांच्यावर चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि.9) सकाळी परळी शहर पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवत आंदोलन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी दिली.

 

Web Title: suicides of maid over stealing charges in Parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.