तांड्यावरील घरांना अचानक आग, गूढ वाढल्याने अंनिसकडून शोधमोहीम; ग्रामस्थांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:39 IST2025-01-23T13:37:38+5:302025-01-23T13:39:32+5:30

कुप्पा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ९० ते १०० लोकसंख्येच्या या तांड्यावरील पाच घरांना आतापर्यंत आग लागलेली आहे.

Sudden fire in houses on Tanda, search operation by ANIS; Fear among villagers, administration unaware | तांड्यावरील घरांना अचानक आग, गूढ वाढल्याने अंनिसकडून शोधमोहीम; ग्रामस्थांमध्ये भीती

तांड्यावरील घरांना अचानक आग, गूढ वाढल्याने अंनिसकडून शोधमोहीम; ग्रामस्थांमध्ये भीती

चिंचाळा (जि. बीड) : वडवणी तालुक्यातील आगर तांड्यावरील घरातील संसारोपयोगी वस्तूंना आठ दिवसांपासून अचानकपणे आग लागत असल्याने येथील नागरिक भयभीत आहेत. दरम्यान वडवणीचे तहसीलदार आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तर बुधवारी वडवणी, बीड आणि महाराष्ट्र अंनिसच्या टीमने घटनास्थळी पोहोचून पाहणी करून शोधमोहीम सुरू केली.

कुप्पा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ९० ते १०० लोकसंख्येच्या या तांड्यावरील पाच घरांना आतापर्यंत आग लागलेली आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य, कपाटातील लॉकरमधील कागदपत्रे आणि इतरही साहित्य जळाले आहे. तसेच तांड्यावरील एका व्यक्तीचा हात भाजला आहे. जनावरांचे खाद्य, भुसकट आणि कडबाही जळाला. आठ दिवसांपासून ग्रामस्थ शेतातील कामे सोडून घरीच थांबून आहेत. तसेच ते रात्रभर जागत आहेत. दरम्यान बुधवारी दुपारीदेखील एका घराच्या मागे आग लागल्याची घटना घडली. तर सायंकाळी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी जाळ कसा लागतो, याचे प्रात्यक्षिक दाखविले. आगीची घटना भानामतीचा प्रकार नसल्याचे पटवून देत त्यांनी प्रयोग करून दाखवले. याबाबत लवकरच स्पष्टता समोर येणार आहे.

अग्निशमन वाहनाची व्यवस्था, पोलिस बंदोबस्त
आगरतांडा येथे घराला अचानक आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी करून दोन दिवसांपूर्वीच वरिष्ठांना कळवले आहे. प्रशासन अलर्ट असून येथे एका अग्निशामक वाहनाची व्यवस्था केली आहे, तसेच पोलिसही संरक्षणाला थांबणार आहेत.
-वैभव महेंद्रीकर, तहसीलदार वडवणी.

नागरिकांनी घाबरू नये
हा प्रकार जादूटोण्याचा नाही. या घटनेच्या तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. लोकांशी संवाद केलेला आहे. हा प्रकार एखाद्या हातानेच होत आहे. याच्या मुळापर्यंत आमची टीम गेलेली आहे. लवकरच याचा तपास आम्ही पूर्ण करणार आहोत.
-माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष अंनिस.

प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा
आगर तांड्यावर गेल्या आठ दिवसांपासून घरातील साहित्यासह इतरही वस्तूंना अचानकपणे आग लागत आहे.
-बाबासाहेब राठोड, ग्रामस्थ, आगर तांडा, कुप्पा.

प्रशासनाचे दुर्लक्ष
आठ दिवसांपासून घरामध्ये संसारोपयोगी वस्तूंना आग लागत आहे. तसेच घराच्या परिसरामध्येही इतर वस्तूंना आग लागत आहे.
-मुक्ताबाई राठोड, ग्रामस्थ, आगरतांडा, कुप्पा.

प्रशासनाने मदत करावी
माझ्या घरातील संसारोपयोगी अनेक सामान जळाले आहे. तांड्यावर आग लागल्यावर ती शमविण्यासाठी एक अग्निशामक गाडीची व्यवस्था करावी.
-बंडू पवार, ग्रामस्थ आगरतांडा, कुप्पा.

Web Title: Sudden fire in houses on Tanda, search operation by ANIS; Fear among villagers, administration unaware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.