हसत हसत परीक्षा केंद्रात गेला; पेपर सुरू होताच विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 19:30 IST2024-12-14T19:29:03+5:302024-12-14T19:30:38+5:30
जिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

हसत हसत परीक्षा केंद्रात गेला; पेपर सुरू होताच विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बीड : पदवीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी अभ्यास करून केंद्रावर पोहोचला. परंतु, तेथे गेल्यावर हृदयविकाराचा झटका आल्याने तो कोसळला. येथील शिक्षकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु त्या आधीच त्याची प्राणज्योत मालवली.
सिद्धांत राजाभाऊ मासाळ (वय २२, रा. एकतानगर, बीड) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बीएसएसी तृतीय वर्षाच्या वर्गात होता. शुक्रवारी त्याची परीक्षा होती. त्यामुळे तो अभ्यास करून बीड शहरातील केएसके महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोहोचला. जाताना मित्रांशी गप्पाही मारल्या. त्यानंतर हॉलमध्ये गेल्यावर अचानक छातीत दुखायला लागले. कोणाला सांगण्याआधीच तो खाली कोसळला. त्याला तातडीने परीक्षा केंद्रातील आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तो मयत असल्याचे समजले. ही माहिती समजताच मित्रांसह नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेत टाहो फोडला.