धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर घेऊन पलायन; दोघे पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:52 IST2025-03-01T13:51:56+5:302025-03-01T13:52:35+5:30

या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे

SSC Exam: Two abscond with 10th English paper from exam center in Dharur; Police took custody | धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर घेऊन पलायन; दोघे पोलिसांच्या ताब्यात

धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून दहावीचा इंग्रजीचा पेपर घेऊन पलायन; दोघे पोलिसांच्या ताब्यात

धारूर ( बीड) : शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतल्यानंतरही दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रातून आज ( दि. १ ) सकाळी फुटला. पेपर सुरू झाल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता दोघांनी एका हॉलच्या खिडकीतून पेपर घेऊन पलायन केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अतिशय शिताफीने अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पेपर जप्त केला आहे.

शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू आहे. आज इंग्रजी विषयाचा पेपर आहे. सकाळी साडेअकरा वाजता केंद्रातील एका हॉलच्या खिडकीतून इंग्रजीचा पेपर घेऊन दोघांनी पलायन केले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी लागलीच तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात फोडणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच घेऊन पळालेला इंग्रजी विषयाचा पेपर त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. 

दरम्यान, पेपर सुरू होताच अर्ध्या तासांत फुटला. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी पेपर फोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच या प्रकाराची शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

पेपर फूटी मागे कोण याचा तपास
जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रातून दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर घेऊन दोघे पळाले होते. त्या दोन तरुणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. या पाठीमागे आणखीन कोण आहे ? पेपर फोडणारी साखळी आहे का? या दृष्टिकोनातून तपास करण्यात येत आहे. 
- देवीदास वाघमोडे, पोलीस निरीक्षक

Web Title: SSC Exam: Two abscond with 10th English paper from exam center in Dharur; Police took custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.