Beed: आजारी नातेवाईकास भेटून परतणाऱ्या दोन वीटभट्टी कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:32 IST2025-03-26T19:31:29+5:302025-03-26T19:32:07+5:30
Beed News: भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन वीटभट्टी कामगारांचा जागीच मृत्यू

Beed: आजारी नातेवाईकास भेटून परतणाऱ्या दोन वीटभट्टी कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू
- मधुकर सिरसट
केज : तालुक्यातील कळंब अंबाजोगाई महामार्गांवर सावळेश्वर व औरंगपूर शिवाराच्या सीमेवर बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भरधावं पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार झाले. सुभाष आश्रुबा मोहिते (50) आणि सुनिल भीमराव पवार ( 40, दोघेही रा बार्शी, ह. मु. सातेफळ वीटभट्टी) अशी मृतांची नावे आहेत.
बार्शी येथील काही कामगार अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथील वीटभट्टीवर काम करतात. नातेवाईक आजारी असल्यामुळे येथील सुभाष आश्रुबा मोहिते आणि सुनिल भीमराव पवार हे दोन कामगार दुचाकीवरून ( क्रमांक एम एच 25 / ए बी 4198) बार्शीला गेले होते. बुधवारी दोघेही परत सातेफळकडे निघाले. यावेळी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान सावळेश्वर व औरंगपूर शिवाराच्या सीमेवर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअकने ( क्रमांक एम एच 20 /जी सी 2108) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला.
माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस कर्मचारी सीताराम डोंगरे, गणेश राऊत, महादेव केदार, रामनाथ वारे यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
वीटभट्टीवर शोककळा
दरम्यान, दोन कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची वार्ता अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारातील वीट भट्टीवर समजली. यामुळे वीटभट्टी परिसरात शोककळा पसरली आहे.