भरधाव बाईक स्कूलबसवर पाठीमागून धडकली; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:37 IST2022-09-24T17:36:54+5:302022-09-24T17:37:39+5:30
केज - बीड रोडवर कोरेगावजवळ झाला अपघात

भरधाव बाईक स्कूलबसवर पाठीमागून धडकली; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
केज (बीड) : भरधाव दुचाकी स्कूल बसला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास कोरेगाव जवळ घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
शहरातील एका शाळेची स्कूल बस (एम एच-४४ /९९९६ ) विद्यार्थ्याना सोडण्यासाठी बीडरोडवरून जात होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास बस कोरेगावजवळील थांब्यावर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी थांबली. याच वेळी भरधाव वेगात आलेली दुचाकी ( क्रमांक एम एच -१३/बी जे ८५७४) बसच्या पाठीमागील बाजूला धडकली.
या अपघातात दुचाकीवरील दिपक कल्याण पवार ( २० ), सुनील मधुकर शिंदे ( २५), भागवत कल्याण पवार ( २२) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच डॉ विजयप्रकाश ठोंबरे, भगवान केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असताना दिपक पवार आणि सुनील शिंदे या दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य एकावर उपचार सुरु आहेत.