परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:18 IST2025-07-08T18:16:01+5:302025-07-08T18:18:23+5:30
परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
मुंबई/परळी: परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या बंद संचांच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे, तर नव्या नवव्या संचाच्या उभारणीसंदर्भात पर्याय काढून सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी दिली. परंतु सध्या संच क्रमांक नऊची उभारणी करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच क्रमांक १ ते ५ च्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात येईल. तर संच क्रमांक ९ उभारणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र त्याबाबत लवकरच व्यापक बैठक घेऊन पर्याय काढून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.” आमदार धनंजय मुंडे यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील जुन्या बंद संचांच्या जागेवर अधिक क्षमतेचा हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याची आणि विद्यमान संच क्रमांक ८ च्या जवळ नववा संच स्थापन करण्याची मागणी लावून धरली.
परळीत आवश्यक पायाभूत सुविधा व जमीन उपलब्ध असल्याने हा प्रकल्प स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सौर ऊर्जा प्रकल्पास मान्यता देण्यात येईल. नवव्या संचाबाबतही सविस्तर बैठक घेऊन सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल.” परंतु संच क्रमांक नऊ उभा करणे परवडणारे नाही.
धनंजय मुंडे यांचे सहा महिन्यांनंतर सभागृहात दमदार पुनरागमन
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात आपले पहिले भाषण करत अभ्यासपूर्ण, संयमी आणि मुद्देसूद मांडणीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आज पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत उपस्थिती लावली.