Short response to Health Department's ‘e-sanjeevaniopd.com’; No calls from 18 districts | आरोग्य विभागाच्या ‘ई-संजीवनीओपीडी.कॉम’ला अल्प प्रतिसाद; १८ जिल्ह्यातून एकही कॉल नाही

आरोग्य विभागाच्या ‘ई-संजीवनीओपीडी.कॉम’ला अल्प प्रतिसाद; १८ जिल्ह्यातून एकही कॉल नाही

ठळक मुद्देमहाराष्ट्रासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारापर्यंतची वेळ आहे. किरकोळ आजारावर घरबसल्या उपचारास १८ जिल्ह्यांचा ठेंगा

- सोमनाथ खताळ

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ आजारांबाबत घरातूनच उपचाराचा सल्ला घेता यावा म्हणून आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन औषधोपचार वेबसाईटला तब्बल १८ जिल्ह्यांनी ठेंगा दिला आहे. ‘ई-संजीवनीओपीडी.कॉम’ या वेबसाईटवर गुरुवारी एका दिवसात राज्यातील या जिल्ह्यांतून एकही कॉल आला नाही. सर्वाधिक २४ कॉल रायगड जिल्ह्यातून आले.

नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ही वेब साईट तयार करण्यात आली आहे. यद्वारे देशातील प्रत्येक व्यक्तीला किरकोळ आजारांवर घर बसल्या मार्गदर्शन आणि सल्ला दिला जात आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेळ असून महाराष्ट्रासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारापर्यंतची वेळ आहे. यावर लोक त्यांच्याशी संवाद साधून उपचार घेऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या या वेबसाईटला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.  गुरुवारी यासंदर्भात आढावा घेतला. 

१८ जिल्ह्यांतूनही एकही कॉल नाही
३६ पैकी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथून एकही कॉल आला नाही .

कसा साधायचा संपर्क? 
गुगलमध्ये ‘ई-संजीवनीओपीडी.कॉम’ ही साईट उघडावी. आपला मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी येईल. तो त्यात टाकून पुढे आपले पूर्ण नाव, वय, जिल्हा, राज्याची निवड करावी. त्यानंतर आपला आजार काय आणि काय मार्गदर्शन हवे, याबाबत बातचीत करावी. आपल्या आजाराबद्दल सुरुवातीला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला औषधांची नावे येतात.

कोठून किती प्रतिसाद 
२४ कॉल हे रायगड जिल्ह्यातील जनतेने केले. पुणे १४, मुंबई शहर ११, लातूर ९, औरंगाबाद ८, मुंबई ७, अकोला ४, नागपूर ४, तर पालघरमधून २ कॉल आले.

याबाबत वारंवार जनजागृती केली. तरीही प्रतिसाद मिळत नाही, हे खरे आहे. नागरिकांनीच जागरूक होऊन याचा लाभ घेण्याची गरज आहे. आणखी एकदा याचा आढावा घेऊन सूचना केल्या जातील.
-डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

आठ जिल्ह्यांतून केवळ एक कॉल 
अहमदनगर, बीड, बुलडाणा, धुळे, जळगाव, नांदेड, नाशिक, सांगली या ८ जिल्ह्यांतून दिवसभरात केवळ एक कॉल आला. 

Web Title: Short response to Health Department's ‘e-sanjeevaniopd.com’; No calls from 18 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.