धक्कादायक ! कारखान्याने गाळपासाठी ऊस न नेल्याने विषारी द्रव्य प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:04 IST2018-12-19T18:03:17+5:302018-12-19T18:04:24+5:30
वीस दिवसांनी उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

धक्कादायक ! कारखान्याने गाळपासाठी ऊस न नेल्याने विषारी द्रव्य प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
माजलगाव (बीड ) : कारखाना जाणीवपूर्वक ऊस नेत नसल्याचा आरोप करत एका शेतकऱ्याने लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याच्या किट्टी आडगाव येथील शेतकी कार्यालयासमोर विषारी द्रव्य प्राशन केले होते. या शेतकऱ्याचा आज वीस दिवसांनी उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील शेतकरी महारुद्र बाबासाहेब जाधवर या शेतकर्याचा तीन एकर उस असून त्या उसाची लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला वडिलांचे नावे नोंद होती. ऊस कारखान्याला नेण्यासाठी उसतोडीचा प्रोग्राम आलेला असतांनाही कारखान्याने उस नेला नाही. आगोदरच आर्थिक अडचणीत असल्याने वैतागलेल्या जाधवर यांनी शुक्रवार दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी कारखान्याच्या किट्टी आडगांव येथील कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. तेंव्हा पासून बीड येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान, आज पहाटे पाच वाजता त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात तीन मुली असून हा परिवार आता उघड्यावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.