एक हजार रुपयांची लाच घेताना भूमिअभिलेखचा कर्मचारी रंगेहाथ पकडल्याने खळबळ
By सोमनाथ खताळ | Updated: June 26, 2023 15:57 IST2023-06-26T15:56:46+5:302023-06-26T15:57:27+5:30
हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता.

एक हजार रुपयांची लाच घेताना भूमिअभिलेखचा कर्मचारी रंगेहाथ पकडल्याने खळबळ
अंबाजोगाई : मोजनीची हद्द कायम करणे. नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. यामध्ये फीस भरूनही एक हजार रुपयाची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
मुबारक बशिर शेख (वय-५७ ) रा. प्रकाशनगर, लातूर) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अंबाजोगाई येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्य सहायक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. ५३२,५३३ ची कायदेशीर फिस भरुन मोजणीकरुन घेतली होती. सदर मोजणीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. शेख यांनी शासकीय फिस वगळता एक हजार रुपयाची तक्रारदार यांचेकडे मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबी येथे तक्रार दिली. त्यावरुन एसीबीने सापळा लावला.
आज दुपारी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शेख याने तक्रारदार यांचेकडे एक हजार रुपयाची मागणी केली. पंचासमक्ष त्याच्या कक्षात तक्रारदार यांचेकडून लाच स्विकारताच त्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे,भरत गारदे, संतोष राठोड, नामदेव ऊगले यांनी केली.