माहेरी वृक्षारोपण करून ती जाते सौभाग्यासोबत नांदायला....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:51 AM2019-12-16T00:51:05+5:302019-12-16T00:51:42+5:30

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड अनिवार्य असल्याचा सावधानतेचा इशारा व मंगलाची वृध्दी होण्यासाठी हळदीच्या अंगाने, मेंदीच्या हाताने, तसेच हातात हिरवा चुडा व मुंडावळीच्या साक्षीने आपल्या सौभाग्यासह माहेरी वृक्षरोपांची लागवडही आठवण ठेवून माहेरवाशीण नांदायला जाते. असा अनोखा पण अनुकरणीय उपक्रम खालापुरीमधे सुरू केलाय.

She goes with a sapling plantation to share with her good luck ....! | माहेरी वृक्षारोपण करून ती जाते सौभाग्यासोबत नांदायला....!

माहेरी वृक्षारोपण करून ती जाते सौभाग्यासोबत नांदायला....!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड अनिवार्य असल्याचा सावधानतेचा इशारा व मंगलाची वृध्दी होण्यासाठी हळदीच्या अंगाने, मेंदीच्या हाताने, तसेच हातात हिरवा चुडा व मुंडावळीच्या साक्षीने आपल्या सौभाग्यासह माहेरी वृक्षरोपांची लागवडही आठवण ठेवून माहेरवाशीण नांदायला जाते. असा अनोखा पण अनुकरणीय उपक्रम खालापुरीमधे सुरू केलाय. खालापुरी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप व शासकीय कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्तुत्य अशा उपक्रमात वनविभागाने आपलाही सहभाग नोंदवला आहे. ‘शुभ मंगल सावधान’ची सुरुवात भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या जवानाच्या व त्याच्या सहचारिणी या नव दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.
तालुक्यातील खालापुरी हे शिरूरच्या पूर्वेला, तर श्रीक्षेत्र नारायण गडाच्या पश्चिमेला पायथ्याशी वसलेले गाव आहे. येथे शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने असून, नव्याचा शोध घेणारी तरूणाई आणि साथीला वयोवृद्ध मंडळींचा पाठिंबा. सतत वेगळा उपक्रम हाती घेऊन त्याची पूर्तता करणे ही त्यांची खासियत. प्रत्येक वर्षी वेगळा उपक्रम राबविण्यात येतो.
या वर्षी मुलीला माहेरहून लग्न लावून सासरी पाठवताना तिची आठवण म्हणून लेक व जावई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला व त्याचा प्रथम मानकरी म्हणून भारतीय जवान योगेश कुंडलिक रकटे व शीतल अशोक परजने यांच्या हस्ते या ‘शुभमंगल सावधान’ या उपक्रमास सुरुवात झाली. दुसरा विवाह वर्षा कल्याण परजने व आनंद म्हसूनाथ खोड या नवदाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यानंतर लेकीची आठवण म्हणून त्या रोपाचे संगोपन करण्यासाठी लेकीच्या माहेरच्यावर पालकत्वाच्या नात्याने सोपवली जाते. लेक जावयाने लावलेले झाड आता लेकीप्रमाणेच लाडाने वाढवण्याची नैतिक जबाबदारी माहेरच्या लोकामार्फत स्वीकारली जाते. या उपक्रमामुळे पर्यावरण व मंगलवृध्दी असा दुहेरी हेतू साध्य होणार असल्याने प्रत्येकाला हा उपक्रम आपला कौंटुबिक असल्याची जाणीव होत आहे .
खालापुरी ग्रुप व शासकीय कर्मचारी यांचा संयुक्त उपक्रम असला तरी खालापुरीच्या घराघरातील प्रत्येकाचा त्यात सहभाग सामावला जातो. वृक्ष लागवड हा उपक्रम वनविभागाशी निगडीत असल्याने याच गावचे रहिवासी असलेले बद्रिनाथ परजने व त्यांचा वनविभाग या कार्यासाठी हातभार म्हणून लागणारी रोपे उपलब्ध देण्याची जबाबदारी स्विकारत आहे.
एवढ्यावरच न थांबता जो कोणी असा उपक्रम हाती घेईल त्याला देखील वृक्षारोपाच्या मर्यादेत सहकार्य केले जाईल, असे बद्रीनाथ परजने यांनी लोकमतजवळ सांगितले.
लग्नप्रसंगी व तिथी तारीख सांगितल्यानंतर रोपे थेट मांडवाच्या दारात पोहोचती केली जातील, याची हमी देखील त्यांनी दिली आहे .
पर्यावरणाचे संतुलन व वृक्ष लागवडीचे महत्त्व आता जवळपास सर्वांनाच उमगले आहे. त्याला प्रेरणा देण्यासाठी आणि झालेल्या बेसुमार वृक्षतोड सावधानतेचा इशारा वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य करण्यासाठी खालापुरीकरांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद तर आहेच शिवाय तो अनुकरणीय देखील आहे.
प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ग्रुपच्या सर्व सदस्यांकडून व शासकीय कर्मचारी खालापुरी यांनी केले आहे. आपल्या या कामाची दखल घेत खालापुरी ग्रामस्थांशिवाय बाहेरचे हात देखील या उपक्रमासाठी लागलेले असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: She goes with a sapling plantation to share with her good luck ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.