बीडचं पुणे होण्यापासून वाचवा; कोथरुडमधील बॅनरबाजीनंतर बीडकरांचे आंदोलनातून टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:19 IST2025-03-04T17:18:13+5:302025-03-04T17:19:05+5:30
बीडची बदनामी थांबवा : कोथरुडमध्ये बॅनर लावणाऱ्यांवर बीडच्या आंदोलकांनी केली टीका

बीडचं पुणे होण्यापासून वाचवा; कोथरुडमधील बॅनरबाजीनंतर बीडकरांचे आंदोलनातून टीकास्त्र
बीड : कोथरुडचे बीड होण्यापासून वाचवा, असे बॅनर पुण्याच्या कोथरुडमध्ये लागले होते. त्यानंतर बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्याविरोधात बीडची बदनामी थांबवा म्हणत पुणे जिल्ह्यातील घटनांचा इतिहास सांगत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. एवढेच नव्हे तर बीडचे पुणे होण्यापासून वाचवा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर बॅनर लावणाऱ्यांवरही आंदोलकांनी गंभीर टीका केली.
बीड जिल्हा हा गुणवंतांचा आहे. या जिल्ह्याने कला, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय पातळीवर तसेच न्यायिक अशा विविध क्षेत्रात नाव उंचावलेले आहे. स्नेहभाव जपणारा, जातीय सलोखा जोपासणाऱ्या या बीड जिल्ह्याला काही लोक बदनाम करत आहेत. बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि "कोथरुडचं बीड होऊ देणार नाही" पुण्यामध्ये बीडची बदनामी करणाऱ्या लागलेल्या फलकाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युन्नूस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, रामधन जमाले, सखाराम बेंगडे आदी सहभागी होते. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पुणेकरांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे
पुण्यातील कोथरुडमध्ये बीड जिल्ह्याच्या विरोधात बॅनर लागावे ही घटना अत्यंत हास्यास्पद आहे. पुण्यात अनेक काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. हेच पुणेकर कोथरुडचे बीड होऊ देणार नाहीत असे म्हणत पुणेकरांनी आता नाकाने कांदे सोडणे बंद करावे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी केली.
या घटनांची पुणेकरांना दिली उदाहरणे
पुण्यामधील कोयता गँग, अंमली पदार्थांची तस्करी, महिलांवर होणारे अत्याचार, लुटमार, मारामारी अशा अनेक घटना पुण्यात घडतात. जर इतिहास पाहिला तर जोशी अभ्यंकर हत्याकांड, रंगा बिल्ला यांना पोसणारा, महापुरुषांबद्दल गैरवर्तन, महात्मा गांधींना मारणारा नथुराम यांना पोसणारा अशी अनेक उदाहरणे या आंदोलनातून देण्यात आली आहेत. त्यामुळे बीडची बदनामी थांबवावी. पुणेकरांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे आणि आपल्याच जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.