भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:13 IST2024-12-10T12:13:18+5:302024-12-10T12:13:46+5:30
रात्री नऊ वाजता कडक्याच्या थंडीत ग्रामस्थांनी मस्साजोग येथे केले ठिय्या आंदोलन

भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद
- मधुकर सिरसट
केज ( बीड): तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे जुन्या वादातून अपहरण करून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास कडक्याच्या थंडीत सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून तत्काळ फाशी द्या, मदत न करणाऱ्या दोषी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करा, प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मस्साजोग बसस्थानकासमोरील महामार्गांवर ठिय्या आंदोलन केले. तर आज सकाळी ७ वाजेपासून मस्साजोग आणि साडेदहा वाजेपासून केज येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले. दोन्ही ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान केज येथून मस्साजोगकडे जीपमधून ( क्रमांक एम एच 44 / बी 3230 ) निघाले. उमरी शिवरातील टोल नाक्याजवळ पाच ते सहा जणांनी त्यांची जीप अडविली. गाडीच्या काचा फोडून सरपंच संतोष देशमुख यांना बाहेर काढत काठीने मारहाण करून अपहरण केले. मारकऱ्यांच्या दोन जीप देशमुख यांना घेऊन केजच्या दिशेने गेल्या. त्यानंतर जीपचालक शिवराज देशमुखने केज पोलीस ठाणे गाठून सरपंच संतोष देशमुख यांचे अज्ञात ६ जणांनी मारहाण करत अपहरण केल्याची फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तातडीने दोन पथकांची स्थापना करून तपासाचे आदेश दिले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बोरगाव दैठना या रस्त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन; मस्साजोग,केज मध्ये वाहतूक ठप्प
दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास कडक्याच्या थंडीत मस्साजोग बसस्थानकासमोर ठिय्या देत रस्तारोको केला. सर्व आरोपींना अटक करा, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मस्साजोगमधील वृद्ध, महिला, ग्रामस्थांनी केली. रस्तारोकोमुळे दोन्ही बाजूने तब्बल ५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. काही वाहनधारक आरणगांव, जाधवजवळा मार्गे तर काही पिंपळगाव, विडा, येवता मार्गे पुढे गेले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, पहाटे दीड वाजता पोलिसांनी तीन आरोपी पकडल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आज सकाळी सात वाजेपासून पुन्हा एकदा ग्रामस्थांनी सर्व आरोपींच्या अटकेची मागणी करत मस्साजोग येथे तर सकाळी साडेदहा पासून केज येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुन्हा एकदा मस्साजोग ते केज महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होऊन मोठ्याप्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तीन आरोपी पकडल्याची माहिती
सोमवारी सायंकाळी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोन पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला. आरोपी जीपमधून वाशीकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नांदुर ते वाशी रस्त्यावर पाठलाग केला. तसेच वाशी पोलिसांना माहिती देऊन पुढे रस्ता अडविण्यात आला. यामुळे जीप मध्येच उभी करून आरोपी पसार झाले. मागावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.