सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण; काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:36 IST2025-02-24T15:35:30+5:302025-02-24T15:36:18+5:30
सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची काँग्रेससह इतर नेत्यांनी घेतली भेट

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण; काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा
केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची रविवारी माजी मंत्री तथा चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील आणि भीम आर्मीचे दीपक केदार यांनी भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा काढणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले.
मस्साजोग येथे रविवारी सकाळी ११ वाजता भीम आर्मीचे दीपक केदार यांनी भेट देत भीमसैनिक म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे सांगितले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे रील्स फेसबुक व इन्स्टाग्रामवर टाकले जातात. तरीसुद्धा येथील सायबर यंत्रणा यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरली आहे. पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन अशा सर्व अकाऊंटची सविस्तर माहिती आपण त्यांना सादर करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मस्सजोग ते बीड सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप बीड येथे होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी मस्साजोग येथे दिली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळात पाटील यांच्यासह बीडचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, सत्संग मुंडे आदी होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणार
उद्धवसेनेचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनीही रविवारी धनंजय देशमुख यांची भेट घेऊन तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मस्साजोगला येण्याची मानसिकता आहे. आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची त्यांना सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगून एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना सापडत नाहीत, हे पोलिस यंत्रणेचे अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला.