सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:33 IST2025-01-28T08:32:57+5:302025-01-28T08:33:48+5:30

अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटने या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला असून, त्यांनी आरोग्य विभागावरही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

sarpanch murder case Sudarshan Ghule Mobile Lock CID will re investigate thoroughly will more evidence be found | सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार?

सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार?

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला न्यायालयीन कोठडीतून काढून पुन्हा एकदा ३१ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी मिळाली आहे. त्याच्या जप्त दोनपैकी एका मोबाइलचे लॉक उघडत नाही, तसेच इतरही टेक्निकल पुरावे हाती लागले असून, त्याचाही तपास सीआयडी करणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटने या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला असून, त्यांनी आरोग्य विभागावरही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यात सुदर्शन घुले, वाल्मीक कराडसह नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील कृष्णा आंधळे अजूनही मोकाट आहे.  याच प्रकरणात वाहनांसह मोबाइल जप्त केले आहेत. यात घुलेच्या दोन मोबाइलचाही समावेश आहे. त्यातील एका मोबाइलचे लॉक उघडत नाही. त्यासह इतरही तपास करायचा असल्याने सीआयडीने घुलेच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. १० दिवसांची कोठडी मागितली होती. यात आरोपी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत त्याला ३१ जानेवारीपर्यंत कोठडी दिली आहे. इतर सातही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, बीडच्या कारागृहात आहेत. 

कराडच्या जवळचे कोण?
दमानिया यांनी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, कर्मचारी हे वाल्मीक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप केला आहे. २६ लोकांची यादीच त्यांनी व्हायरल केली आहे. या अगोदर एलसीबीतील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा फोटो कराडसोबत व्हायरल झाल्याने एसआयटी पथक बरखास्त करण्यात आले होते.

अंजली दमानियांच्या ट्वीटने ट्विस्ट
वाल्मीक कराड याला जिल्हा रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर आरोप केले. त्यांचे अंबाजोगाईत हॉटेल आहे.
तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ते ओएसडी होते. बीडहून नाशिकला बदली झाल्यावर त्यांना पुन्हा आशीर्वाद देऊन बीडला आणल्याचा दावा त्यांनी केला, तर दुसऱ्या बाजूला डॉ. थोरात यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
आपण २२ ते ३० जानेवारीपर्यंत रजेवर असून, बीड व परळीच्या डॉक्टरांसमवेत विदेशात आल्याचे सांगितले. याचे पुरावेही डॉ. थोरात यांनी माध्यमांना दिले. 

घुलेनंतर आठवले गँगवरही मकोका
मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपी आठवले गँगवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मधील कलमांचा अंतर्भाव करून मकोका लावण्यात आला आहे. टोळीतील चार आरोपी अटक असून दोघे अजूनही फरार आहेत. सोमवारी बीड पोलिसांनी ही माहिती दिली. 
सरंपच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बीड शहरातील बार्शी नाका भागात आठवले गँगने विश्वास डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात १३ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता.   

कुख्यात आठवले गँगमध्ये कोण कोण आहेत सदस्य?
आठवले गँगचा प्रमुख हा अक्षय श्याम आठवले (२८) हा आहे. त्यात मनीष ऊर्फ प्रतीक प्रकाश क्षीरसागर (२५), ओंकार सिद्धार्थ सवई (२५), प्रसाद मोतीराम धिवार, सनी श्याम आठवले आणि आशिष श्याम आठवले यांचा समावेश आहे. यातील फरार सनी आठवले याने पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि वाल्मीक कराड यांचे कथित कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल केले होते. 

Web Title: sarpanch murder case Sudarshan Ghule Mobile Lock CID will re investigate thoroughly will more evidence be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.