संतोष देशमुखांच्या भावाला वाल्मीक कराड समर्थकाची पोलिस ठाण्यात अरेरावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:24 IST2025-01-03T11:24:02+5:302025-01-03T11:24:59+5:30
वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या ठाण्यातील प्रकार

संतोष देशमुखांच्या भावाला वाल्मीक कराड समर्थकाची पोलिस ठाण्यात अरेरावी
बीड : खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या बीड शहर ठाण्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना एका माजी सरपंचाने अरेरावी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने अरेरावी करणाऱ्याला पाठीशी घातल्याचा आरोप धनंजय यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली. यातील सातपैकी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी अजूनही मोकाटच आहेत. जेव्हापासून सीआयडीकडे तपास आला, तेव्हापासून एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे धनंजय देशमुख व त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहर ठाण्यात आले होते. यावेळी तेथे कारेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळेदेखील वाल्मीक कराडला भेटण्यासाठी आले होते. तांदळे यांनी धनंजय यांना ‘तू इथे काय करायला, सीआयडीवाले कुठे आहेत’, असे म्हणत वाल्मीक कराड याला ठेवलेल्या कोठडीकडे गेले. तिथून परत आल्यानंतर ‘तुम्ही ६ डिसेंबरच्या दिवशी पवनचक्कीजवळ झालेल्या वादाच्या ठिकाणी होतात’, असे धनंजय म्हणाले. यावर ‘आरोपी मीच पकडले’ असे सांगत हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले याचा फाेटो धनंजय यांना दाखवत तांदळे यांनी अरेरावी केली.
हा प्रकार देशमुख यांनी ठाणे अंमलदार मीरा रेडेकर यांना सांगितल्यावर तांदळे यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. ‘मी सीआयडीचा वाहनचालक आहे’, असे त्याने दंगल नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांनाही सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संंबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
घुलेचा फाेटो दखवून दहशत
ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या आरोपी सुदर्शन घुले याचा फोटो दाखवून तांदळे हा मला दहशतीखाली घेत होता, अशी तक्रार धनंजय यांनी केली. त्यामुळे तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले, दराडे आणि तांदळे यांचे संगनमत आहे. त्यामुळे दराडे यांचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारीतून केली आहे.
कारवाई होईल
धनंजय देशमुख यांची तक्रार आली आहे. याची चौकशी केली जात आहे. सीआयडीने कोणाला चौकशीला बोलावले होते की खोटे बोलून आत प्रवेश केला, याची चौकशी केली जाईल. जर कोणी दोषी असेल तर कारवाई होईल.
- सचिन पांडकर, अपर पोलिस अधीक्षक, बीड.