संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका, भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केली भीती, कुणाचं घेतलं नाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:11 IST2026-02-21T14:10:21+5:302026-02-21T14:11:37+5:30
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका, भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केली भीती, कुणाचं घेतलं नाव?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख केला आहे. यामुळे आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचीही त्यांनी भिती व्यक्त केली. त्यांनी याबाबत सीआयडीला माहिती देण्यात दिली असून सुरक्षेची मागणी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या सहा महिन्यात तीन वेळा त्यांच्या गावात येऊन गेला, याची माहिती आम्ही सीआयडीला दिली आहे. त्यांनी देखील हे मान्य केले आहे की, हा आरोपी गावात येऊन गेला आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, त्याच्याकडून आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून संपूर्ण बीड जिल्ह्यात त्याची धिंड काढावी."
बीड सत्र न्यायालयाने आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाला कडक सूचना दिल्या आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आरोपी पक्षाला करण्यात यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. पुराव्यांच्या कमतरतेमुळे आणि तांत्रिक बाबींमुळे खटल्याला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.
आजच्या सुनावणीत आरोपींचे वकील, पुराव्यांची कमतरता आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून बदलण्यात यावे, असा अर्ज कोर्टात केला आहे. या अर्जावर आता सरकारी पक्षाला आपले लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश कोर्टाने दिले. आरोपी जयराम चाटे याने आपले वकील बदलले असून आता त्याच्या वतीने अॅड. एम. के. वाघीरकर काम पाहणार आहेत. तसेच, आरोपी प्रतीक घुले याने वकील लावण्यासाठी १०-१५ दिवसांचा वेळ मागितला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्चला होणार आहे.